महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने आज शनिवारी परंपरेनुसार छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून श्री शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री शिवजयंती निमित्त आज शनिवारी सकाळी सर्वप्रथम धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गडकिल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहापूर छ. शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ मूर्तीचे महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर आणि ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवभक्त आणि समिती कार्यकर्त्यांनी शिवरायांचा जयजयकार करून उद्यान दणाणून सोडले होते. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रमाकांत कोंडुसकर की जय, अमर येळळूरकर की जय असा जयघोष यावेळी सुरू होता. पुष्पहार घालून मूर्ती पूजन झाल्यानंतर उमेदवार ॲड. येळ्ळूरकर आणि कोंडुसकर यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. त्यानंतर मध्यवर्तीय म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी श्रीफळ वाढविले.
याप्रसंगी समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, मदन बामणे, नगरसेवक रवी साळुंखे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, सिद्धार्थ भातकांडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, गणेश दड्डीकर आदींसह बहुसंख्य शिवभक्त व समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवपूजनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी आजच्या शिवजयंती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शिवरायांचा आशीर्वाद घेतला असल्याचे सांगितले. तसेच आपल्यासह म. ए. समितीचे बेळगाव उत्तर मधील उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर, बेळगाव ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले, खानापूरचे उमेदवार मुरलीधर पाटील आणि यमकणमर्डीचे उमेदवार मारुती नाईक यांना जनतेने बहुमताने विजयी करावे असे आवाहन करून सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या.
उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, छ शिवाजी महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून आज आपण समाज घडविला पाहिजे. शिवछत्रपतींनी 350 वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने देशात लोकशाही आणली. सर्व जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि सर्वांना समान न्याय मिळवून दिला.
या त्यांच्या कार्याला वंदन करून त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शिवरायांच्या विचारांचे अनुकरण करणारी महाराष्ट्र एकीकरण समिती आज या भागात निवडणूक लढवत आहे. तेव्हा समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणणे ही काळाची गरज आहे असे सांगून सर्वांनी समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणावे, असे आवाहन ॲड. येळ्ळूरकर यांनी केले.