केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी घरातून मतदान मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या 6 मे 2023 पर्यंत राज्यातील दिव्यांग व्यक्तींसह 80 वर्षावरील वयस्कर नागरिक आणि पत्रकारांना आपल्या घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
घरातून मतदान करण्यासाठी राज्यातील 80,250 वयस्क नागरिक आणि 19,279 विकलांग अर्थात दिव्यांग व्यक्तींनी नांव नोंदणी केली आहे. सदर मतदानाची गोपनीयता बाळगण्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी फॉर्म 12 डी या अर्जाच्या माध्यमातून घरातून मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने नियुक्त पथकांकरवी घरोघरी जाऊन मतपत्रिकेच्या (बैलेट पेपर) आधारे मतदान करून घेतले जाणार आहे. यावेळी संबंधित मतदारांनी मत कोणाला घातले ही बाब वगळता उर्वरित सर्व मतदान प्रक्रिया पीडीओंकडून केली जाणार आहे.
घरातून मतदान करून घेण्यासाठी आपण येत असलेल्या मार्गाचा रूट मॅप, तारीख आणि वेळ निवडणूक अधिकाऱ्यांकडून संबंधित मतदारांना कळविण्यात येत आहे.
त्यानुसार घरोघरी जाऊन मतदान पत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.