कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर व दक्षिणमधून म. ए. समितीचा उमेदवार निवडण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील समिती कार्यकर्त्यांचीच निवड समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कोणत्याही चांगल्या लायक उमेदवारावर अन्याय होणार नाही याची काळजी घेत पारदर्शीपणे जनतेतून म. ए. समितीचा राजकीय पक्षांना टक्कर देणारा अत्यंत तुल्यबळ असा उमेदवार निवडेल, असा विश्वास मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी व्यक्त केला.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हने महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवार निवड प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मालोजी अष्टेकर बोलत होते.
ते म्हणाले की, बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील उमेदवार निवडीसाठी या दोन्ही मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचीच निवड समिती तयार केलेली आहे. या निवड समितीने आपल्याला मदत करण्यासाठी दोन्ही मतदार संघातील कार्यकर्त्यांना सोबत विश्वासात घेऊन उमेदवार निवड प्रक्रिया अतिशय उत्तम प्रकारे राबवण्याचे आश्वासन महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले आहे. आतापर्यंतच्या निवडणुकानुसार जनतेचा कौल घेऊन उमेदवार निवडणे महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने उमेदवाराची निवड करण्याचे आदेश आम्ही दोन्ही निवड समित्यांना यापूर्वीच दिले आहेत.
उमेदवाराची निवड करताना त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यातील त्याचे योगदान, तसेच इतर समाजाशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घ्या. तो त्या समाजातून किती मोठ्या प्रमाणात मते मिळवू शकतो हे पहा, अशा सूचना निवड समितीला करण्यात आल्या आहेत. एकंदर उमेदवार निवड अत्यंत पारदर्शक होणे अत्यावश्यक असून ती तशीच होणार आहे. कोणत्याही चांगल्या लायक उमेदवारावर अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे, असे अष्टेकर यांनी सांगितले.
समितीचा उमेदवार निवडण्याकरिता महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते मतदार व नेतेमंडळींनी स्वतःहून मदत करावी. जो कोणी उमेदवार सर्वानुमते निवडणुकीस पात्र असेल त्याची निवड करण्यासाठी जनतेने देखील समितीला मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढवणारा आणि राष्ट्रीय पक्षांना अत्यंत जोरकसपणे टक्कर देणारा उमेदवार महाराष्ट्र एकीकरण समितीने देणे अत्यावश्यक आहे, याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावी आणि त्या दृष्टिकोनातून समितीचा अत्यंत तुल्यबळ उमेदवार निवडावा, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे असे ते पुढे म्हणाले.
संबंधित मतदार संघातील निष्ठावंत चांगल्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून उमेदवाराची निवड करण्याचे आदेशही आम्ही दोन्ही निवड समितीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. अजून थोडे दिवस हातात आहेत. या काळात या निवड समितीकडून निश्चितपणे चांगला प्रबळ उमेदवार निवडला जाईल असा आम्हाला विश्वास आहे, असेही सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.