बेळगाव लाईव्ह : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये नाराजीसत्र सुरु झाले आहे. याचाच भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही भाजपाला रामराम ठोकत आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून तीनवेळा आमदारपद भूषविले आहे. येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र अथणी मतदार संघात विद्यमान आमदार महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी विधान परिषद सदस्यपदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरुवारी आपण मजबूत निर्णय घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “मी माझा निर्णय घेतला आहे. भिकेचा कटोरा घेऊन फिरणारा मी नसून मी एक स्वाभिमानी राजकारणी आहे. मी कोणाच्या प्रभावाखाली वागत नाही,” असे सांगितले.
गेल्या दोन-चार दिवसांपासून अथणी मतदार संघातून लक्ष्मण सवदी यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. तसेच माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी अथणी मतदार संघातून महेश कुमठळ्ळी यांनाच उमेदवारी देण्यासाठी आड्काठीही केली होती.
यामुळे लक्ष्मण सवदी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही राजकीय सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली होती. येत्या दोन दिवसात लक्ष्मण सवदी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.