राज्यात यावेळी काँग्रेसचे सरकार आणण्याचा निर्धार करणारे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी नवे वाहन सिद्ध झाले असून हे वाहन बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांमधील प्रचार कार्यात सहभागी राहील, असे विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले.
शहरातील काँग्रेस भवन आवारामध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नव्या प्रचार वाहनाचा आज शनिवारी सकाळी ध्वज दाखवून शुभारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सदर नवे वाहन हे स्वतः सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या प्रचार कार्यासाठी तैनात केले आहे. त्याचप्रमाणे एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आदींसह मी सुद्धा बेळगावातील प्रचारासाठी याच वाहनाचा वापर करणार आहे.
मागील निवडणुकीमध्ये 6 मतदार संघांमधील आमचे उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळी जनमत काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे आम्ही किमान 15 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करून भाजपने केलेला भ्रष्टाचार, त्यांचे व्देशाचे राजकारण, जनविरोधी नीती यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.
काँग्रेसने जाहीर केलेल्या पाच गॅरंटींवर जनतेचा विश्वास आहे जनतेला प्रारंभापासूनच काँग्रेसवर भरवसा आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेसला निश्चितपणे जनतेचा पाठिंबा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, सचिव सुनील हणमण्णावर, काँग्रेस शहर अध्यक्ष राजू सेठ, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, युवा नेते राहुल जारकीहोळी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रदीप एम. जे. आदिंसह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.