बेळगाव लाईव्ह : भाजपने आश्चर्यचकित करणारी उमेदवार यादी जाहीर केली असून ग्रामीण मतदार संघातील इच्छुक उमेदवार, माजी आमदार संजय पाटील यांनादेखील धक्का बसला आहे.
ग्रामीण मतदार संघात केवळ रमेश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय म्हणून नवख्या उमेदवाराला देण्यात आलेली संधी हि धक्कादायक असून संजय पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
संजय पाटील यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे संघटन मजबूत केले, पक्ष तळागाळातील समाजापर्यंत नेऊन, आमदारकीच्या काळात लोकांची, विकासाची अनेक कामे केली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारीने काम केले.
तरीही त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर व आमच्यावर अन्याय झाल्याची भावना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत व्यक्त केली जात आहे.
याच नाराजीतून बेळगाव ग्रामीण मतदार संघ भाजप मंडळच्या १०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज सुपूर्द केले असून ग्रामीण मतदार संघातील गावनिहाय तसेच युवा मोर्चा, एससी-एसटी मोर्चा, स्लम मोर्चा आदी घटक शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात आपले राजीनामे सादर केले आहेत.
येत्या ८ दिवसांत पक्षश्रेष्ठींनी आपला निर्णय बदलून, संजय पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करावी अन्यथा बैठक घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृत्वाला दिला.