बेळगाव लाईव्ह : गेल्या पाच वर्षात सीमाभागातील मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायादरम्यान राष्ट्रीय पक्षांचे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प होते. मात्र आता मराठी भाषिकांच्या मतांच्या जोगव्यासाठी त्याच राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींना मराठीचा पुळका आला आहे.
राष्ट्रीय पक्षांचा हा कुटील डाव आता प्रत्येक मराठी भाषिक जाणून आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मराठी भाषिक आपल्या मातीतून राष्ट्रीय पक्षांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास ग्रामीण मतदार संघाचे म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केलाय.
ग्रामीण मतदार संघात विविध भागात समितीचा झुंझार प्रचार सुरु आहे. प्रचारात सामील झालेल्या कार्यकर्त्यांची संख्या, समितीच्या झेंड्याखाली मराठी भाषिकांची झालेली एकजूट हे चित्र पाहून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. समिती उमेदवारांचा प्रचार चोहोबाजूंनी दिवसागणिक दुप्पट वेगाने सुरु असून गेल्या आठ दिवसात ग्रामीण भाग समितीने पिंजून काढला आहे. राष्ट्रीय पक्षांकडून देखील घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. गावोगावी मराठीतून भाषण दिल जात आहे.
गेल्या पाच वर्षात मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायावर ब्र न काढलेल्या राष्ट्रीय पक्षांकडून मराठी भाषिकांना विविध आमिष दाखवून मराठी मते विकत घेण्याचा प्रकार सुरु आहे. मात्र आता मराठी माणूस शहाणा झाला आहे. पाच वर्षे मराठी भाषिकांवर अन्याय करणे आणि त्यांच्यावरच राज्य गाजवून निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांसाठी राजकारण करणे, ज्यावेळी बेंगळुरू मध्ये शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्यावेळी राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी चकार शब्द काढला नाही.
मात्र निवडणुकीच्या तोंडावर शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण सुरु झाले आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ अनेक शिवप्रेमी बेळगावमध्ये निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर कारवाई करून हिंडलगा कारागृहात डांबण्यात आले. राष्ट्रीय पक्षांचा कुटील डाव आता मराठी भाषिकांनी ओळखला आहे. राष्ट्रीय पक्षांची हि दुटप्पी भूमिका पाहून मराठी भाषिकांनी या नेत्यांच्या प्रचाराला गल्लीत सुद्धा प्रवेश दिला नाही.
येत्या निवडणुकीत मराठी स्वाभिमान आणि मराठी भाषा टिकविण्यासाठी मराठी मतदार समितीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या निवडणुकीत मराठी मतदार राष्ट्रीय पक्षांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केला.