भारतीय जनता पक्षाने (भाजप) एक महत्त्वाचा निर्णय घेताना विद्यमान आमदार ॲड. अनिल बेनके यांना डावलून बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघामधून रवी पाटील यांना उमेदवारी देण्याच्या स्वरूपात नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. पाटील यांची पार्श्वभूमी प्रभावी असल्यामुळे येत्या निवडणुकीसाठी ते तगडे स्पर्धक ठरू शकतात.
52 वर्षीय डॉ. रवी बी. पाटील यांनी एमबीबीएस आणि एमएस (ऑर्थो) पदवी संपादन केली आहे. एमबीबीएस च्या पदवीसाठी त्यांनी 1989 ते 1995 या कालावधीमध्ये तर एमएस (ऑर्थो) पदवीसाठी 1996 ते 1999 या काळात बेळगावच्या केएलईएस जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरची (व्हीओटीसी) स्थापना केली. तेंव्हापासून हे सेंटर बेळगाव परिसरातील एक प्रख्यात वैद्यकीय उपचार केंद्र बनले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबरोबरच डॉ. पाटील हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठी देखील सुपरिचित आहेत. जनहितार्थ ते सातत्याने मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असतात. या शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, हायपोथायरॉईडीझम, लठ्ठपणा, हाडांची ठिसूळता वगैरे आरोग्याच्या विविध समस्यांबाबत लोकांना माहिती करून दिली जाते. आपल्या वैद्यकीय व्यवसायात ते 99 खाटांचे सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवतात ज्यामध्ये 300 कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात.
डॉक्टर या नात्याने समाजसेवा करत असतानाच डॉ. रवी पाटील यांनी कांही आरोग्य संस्थांची देखील स्थापना केली आहे. ज्यामध्ये होनगा येथील डॉ. रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बेळगाव आतील डॉ. रवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी आणि आठवड्यातील सर्व दिवस 24 तास अखंड कार्यरत राहणाऱ्या व्हीओटीसीचा समावेश आहे.
टीप : उपरोक्त सर्व तपशील हा एखाद्या उमेदवार अथवा राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी नसून जनहितार्थ माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेंव्हा वाचकांनी संपूर्ण विचारांती राजकारण अथवा निवडणुकीशी संबंधित स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. वरील तपशिलातील माहिती ही इंटरनेटवरील विविध स्तोत्रांकडून घेतली असल्यामुळे बेळगाव लाईव्हवर त्याच्या अचूकता, पूर्णता किंवा विश्वसनीयतेची कोणतीही जबाबदारी नाही.