बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या राजकारणात नेहमीच किंगमेकरची भूमिका निभावणाऱ्या रमेश जारकीहोळी पुन्हा एकदा उमेदवार यादी निश्चित करण्यात वरचढ ठरले आहेत. जारकीहोळींचे समर्थक उमेदवारच निश्चित करून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करून घेण्यात जारकीहोळी यांनी यश मिळविले आहे.
बेळगाव ग्रामीण, रामदुर्ग, अथणी, खानापूर, बैलहोंगल अशा मतदार संघातून आपल्या समर्थकांना उमेदवारी देण्याची शिफारस रमेश जारकीहोळी यांनी केली होती. विशेषतः राजकीय वैरत्व असणाऱ्या ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात शड्डू ठोकत या निवडणुकीत ग्रामीण मतदार संघात आपण समर्थन दिलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा सपाटा त्यांनी हायकमांडकडे लावला होता.
ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ‘टफ फाईट’ देत या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचा विडा उचलेले रमेश जारकीहोळी यांनी या मतदार संघात आपल्याच उमेदवाराचे नाव अखेर हायकमांडकडून शिक्कामोर्तब करून घेतले आहे. ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर, अथणीमधून महेश कुमठळ्ळी, रामदुर्गमधून चिक्क रेवाण्णा, खानापूरमधून विठ्ठल हलगेकर आणि बैलहोंगलमधून जगदीश मेटगुड यांना रमेश जारकीहोळी यांनी पाठिंबा दिला होता.
रमेश जारकीहोळी यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असल्याची चर्चा सुरु असतानाच राजकारणात आपला ठसा कसा आहे याचा प्रत्यय आज जारकीहोळींनी दाखवून दिला आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यात रमेश जारकीहोळी किंगमेकर ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.