बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने रमाकांत कोंडुसकर यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या काही बैठकीमध्ये उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर केली असून अधिकाधिक जनमत असलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती.
रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना समितीच्या प्रवाहात आणण्याचे काम केले असून घटक समितीकडे रमाकांत कोंडुसकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे समर्थन पत्र शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सादर केले जात आहे.
रमाकांत कोंडुसकर यांना दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत चालला असून दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी रमाकांत कोंडुसकर हेच योग्य उमेदवार असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने एकच उमेदवार जाहीर करण्यात यावा, उमेदवाराच्या विजयासाठी तनमनधनाने प्रत्येक कार्यकर्ता काम करेल, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विजयासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली तळागाळापर्यंत सर्व कार्यकर्ते काम करतील, अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली आहे.
समितीने अद्याप उमेदवार निश्चित केले नसून अनेक इच्छुकांनी विविध मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. रमाकांत कोंडुसकर यांनीही आपला अर्ज समिती पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला असून ते लवकरच निवड समिती कडेही अर्ज देणार आहेत रमाकांत कोंडुसकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.