बेळगाव लाईव्ह : संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी अत्यंत कमी झाली असून येत्या १५ मे पर्यंतच पुरेल इतका पाणी साठा जलाशयात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
एप्रिल महिन्यात उष्णतेमध्ये वाढ झाल्याने पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. वळीवाने समाधानकारक हजेरी लावल्यास काही प्रमाणात चिंता मिटू शकेल. ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामाना करावा लागत असून सध्या शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरु आहे. उपनगरातील ग्राहक टँकरने पाणी मागवत आहेत. शहरात काही भागांत कूपनलिका व विहिरी आहेत. मात्र विहिरी, कूपनलिकांनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहरात ७२ हजार नळ जोडण्या केल्या असून ५८ वॉर्डापैकी १० वॉर्डामध्ये २४ तास पाणीपुरवठा सुरु आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई होत असल्याने सर्वच वॉर्डातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार जलवाहिनीला गळती लागत असल्याने उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत आहे. तुमरगुद्दी, काकती, होनगा, अलारवाड या ठिकाणी मुख्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली आहे.
यावर उपाय म्हणून एल अँड टी कंपनीने नव्याने जलवाहिनी घालण्याचे काम सुरु केले आहे. शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी १६ जलकुंभ उभारण्याचे काम सुरु आहे.
वळिवणे हजेरी लावल्यास जलाशयात पाण्याचा स्रोत वाढण्याची शक्यता असून जलाशयात असणाऱ्या साठा संपल्यास १५ मे नंतर डेडस्टॉकमधून पाणीपुरवठा करावा लागणार आहे.