गर्व आलेल्यांचे गर्वहरण करण्याची ही वेळ आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीचा वापर न करता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघर्ष करा आणि हक्क मिळवा’ या शिकवणीप्रमाणे वागणे काळाची गरज आहे. कोणालाही न घाबरता छ. शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारसरणीनुसार आपण कार्य करायचे आहे, असे विचार महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार असणारे रमाकांत कोंडुसकर काल बुधवारी सायंकाळी खादरवाडी गावात आयोजित कॉर्नर प्रचार सभेमध्ये बोलत होते. नेहमीप्रमाणे आपल्या आवेशपूर्ण भाषणात कोंडुसकर यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले की, गर्वात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आपल्याला गर्वहरण करायचे आहे, त्यासाठी ताकदीची गरज नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितले आहे. शिका, संघर्ष करा आणि हक्क मिळवा ही शिकवण त्यांनी दिली आहे. समाजाने शिकून सुसंस्कृत होऊन पेनाच्या माध्यमातून लढाई केली पाहिजे. पेनाच्या माध्यमातून आपण लढाई केली तर कोणता माईकालाल आमच्यावर केस घालू शकणार नाही हे लक्षात ठेवा. हेच कार्य आपल्याला करायचे आहे. त्यासाठी ‘ट्रक’ या चिन्हा समोरील बटन दाबा आणि मला बहुमताने विजयी करा असे आवाहन करून माझा विजय हा माझा नसून साऱ्या जनतेचा असणार आहे हे ध्यानात ठेवा, असे कोंडुसकर म्हणाले.
खादरवाडी गावानजीकची 187 एकर शेत जमीन हडप करण्याचा घाट रचला जात आहे. त्याबद्दल बोलताना संबंधित शेतकरी माझ्या घरी आले होते. त्यावेळी मी त्यांना जमिनीचे कागदपत्रे घेऊन या ती जमीन कोण कशी बळकवतात ते मी बघतो असे सांगितले होते. लक्षात घ्या नुसतं कुऱ्हाडीचं पातं झाड तोडू शकत नाही. त्यामध्ये त्याच झाडाचा जेंव्हा दांडा जातो, तेंव्हा कुऱ्हाडीचा घाव पडतो. तसे तुमच्या गावातील एक ह****** नमक हराम माणूस गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी भाजपचा दलाल बनला आहे. मात्र त्या भावाला मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांची 187 एकर जमीन हडप करण्यास मदत करणाऱ्या त्या दरोडेखोरावर आगामी काळात स्वतःचे घर विकण्याची वेळ येणार आहे. कारण आज त्याच्या घरा शेजारी आग लागली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. मात्र पुढील काळात ती आग त्याच्या घरालाही लागणार आहे असे सांगून गोरगरीब शेतकरी, माताभगिनींना भाजपला मत घालण्यासाठी गुंडांकरवी धमकावले जात असल्याच्या वृत्तीवर रमाकांत कोंडुसकर यांनी कडाडून टीका केली.
यावेळी ‘हरभऱ्याच्या झाडाला मक्याची कणसं महाराष्ट्र एकीकरण समिती आणत नाही भाडोत्री माणसं’ हे घोषवाक्य कोंडुसकर यांनी उच्चारताच त्याला उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी शिट्ट्या, टाळ्या आणि घोषणा देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समितीचा प्रचार पाहून राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तेव्हा कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वांनी छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून कार्य करायचे आहे मला उमेदवारी दिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समिती आणि नेतेमंडळींचा मी आभारी आहे.
निवडणुकीसाठी ट्रक हे माझे चिन्ह आहे. ट्रक केंव्हाही धडक मारून उडवू शकतो हे विरोधकांनी ध्यानात ठेवावे. सरकारने गुलाल उधळण्यासाठीच मला हा ट्रक दिला आहे. एक लक्षात ठेवा हा जो रमाकांत कोंडुसकर आहे तो शेतकरी आहे. त्याच्या डोळ्यावर गॉगल नाही. कारण कोंडुसकर निर्भीड आहे, कोंडुसकर निर्व्यसनी आहे, रमाकांत कोंडुस्कर निष्कलंक आहे. माझ्या शेतकरी बांधवांवर मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. माझ्या या मतदारसंघात 2 लाख 38 हजार मतदार आहेत. त्यांचे नेतृत्व मी करणार आहे, आपण ती संधी मला द्यावी ही विनंती. मटन कोणाचेही खा पण बटन समितीचे दाबा, असे परखड आवाहन शेवटी रमाकांत कोंडुसकर यांनी केले. कोंडुसकर यांच्या या भाषणाला खादरवाडी गावातील युवा कार्यकर्त्यांसह नागरिकांची खचाखच गर्दी झाली होती. भाषणातील त्यांच्या ठराविक वाक्यांना मिळणारा टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणांच्या स्वरूपातील उस्फूर्त प्रतिसाद पाहता सर्वांचा कोंडुसकर यांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.