बेळगाव लाईव्ह : खानापूर मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणारे मुरलीधर पाटील यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
खानापूर येथील मुरलीधर पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा झाली. तमाम मराठी भाषिकांचा पाठिंबा लाभलेल्या मुरलीधर पाटील यांनी आज भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
खानापुरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज आणि भजनी पथकासह छ. शिवाजी महाराज यांची मूर्ती व प्रतिमा असलेली पालखी होती. त्या मागोमाग उमेदवार मुरलीधर पाटील यांनी बेळगाव दक्षिणचे म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या समवेत खुल्या जीपमध्ये उभे राहून नागरिकांना अभिवादन केले. ढोल ताशासह अन्य पारंपारिक वाद्यवृंदाच्या दणदणाटात निघालेल्या या मिरवणुकीत भगवे फेटे बांधून समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय होती. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात धरलेले ‘लढा मराठी अस्मितेचा ध्यास संयुक्त महाराष्ट्राचा’ यासारखे मराठी भाषा -संस्कृती आणि सीमाप्रश्नाशी संबंधित अशा मजकुरांचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
भगवे ध्वज फडकवत मोठ्या जल्लोषात निघालेल्या या मिरवणुकी दरम्यान बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, मुरलीधर पाटील यांचा विजय असो, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचा मार्ग दणाणून सोडला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच मराठी भाषिकांचा उत्साह ओसंडून वाहात असलेला दिसून आला. आजच्या वातावरणामुळे समिती उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघाचे समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे विकास कलगटगी आणि बेळगाव मधील अनेक कार्यकर्ते देखील मुरलीधर पाटीलांच्या अर्ज नामांकनात सहभागी झाले होते. मार्गात आणि खानापूर शहरांमध्ये दोन ठिकाणी छत्रपती शिवरायांचा प्रतिमाना हार अर्पण करून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.