बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आणि रमेश जारकीहोळी समर्थक नागेश मन्नोळकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सरदार्स मैदानावर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागेश मन्नोळकर यांनी खुल्या जीप मधून मिरवणुकीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी मंत्री रमेश जारकीहोळी, महाराष्ट्र भाजप नेत्या चित्रा वाघ, गिरीश महाजन, माजी आमदार संजय पाटील, भाजप राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव, महिला मोर्चा पदाधिकारी डॉ. सोनाली सरनोबत, विनय कदम आदींच्या उपस्थितीत धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नागेश मन्नोळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत होता. मात्र वरिष्ठांनी काढलेल्या समजुतीमुळे भाजपचे सर्वच नेते अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नागेश मन्नोळकर बोलताना म्हणाले, भाजपने मला उमेदवारी देऊन मोठा विश्वास दाखविला आहे. हा विश्वास सार्थ ठरवून हि निवडणूक आपण बहुमताने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ग्रामीण मतदार संघाचा विकास येत्या पाच वर्षात एका वेगळ्या उंचीवर करून दाखवू असा दावाही त्यांनी केला.
माजी आमदार संजय पाटील यांनी उद्यापासून ग्रामीण मतदार संघात भव्य प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगितले. धर्म. संभाजी चौकातून सुरु झालेली मिरवणूक कॉलेज रोड मार्गे धनगरी वाद्यांच्या तालावर शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागातून पुढे सरकली.
यावेळी राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरात गणेश पूजनाने तहसीलदार कार्यालयाकडे कूच करण्यात आली. यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.