टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील बॅरिकेड्स हटवावेत या मागणीसाठी स्थानिक नागरिक गेल्या कांही वर्षापासून सातत्याने लढा देत असूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता आणखी एका पर्यायाचा अवलंब करताना बॅरिकेड्स न हटविल्यास यंदाच्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा टिळकवाडीतील नागरिकांनी दिला आहे.
टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथे काँग्रेस रोडवर रस्त्यामध्ये घातलेले बॅरिकेड्स हटविण्यात यावेत यासाठी गेल्या 8 वर्षाहून अधिक काळ सुभाष घोलप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक लढा देत आहेत. त्यांच्याकडून बेळगावपासून दिल्लीपर्यंत सर्व अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदनं देऊन झाले तरी अद्याप ते बॅरिकेड्स हटविण्यात आलेले नाहीत.
याच्या निषेधार्थ टिळकवाडीतील काही रहिवाशांनी यंदाच्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पहिला रेल्वे गेट येथे आगळे आंदोलन छेडताना त्यांनी त्या ठिकाणी ‘8.5 साल बॅरिकेड लगाकर लोगों का रस्ता बंद करने से मतदान पर बहिष्कार’, ‘8.5 वर्षे बॅरिकेट लावून सार्वजनिक रस्ता बंद केल्याने मतदानावर बहिष्कार’, ‘टिळकवाडी पहले रेल गेट परेशानी बॅरीकेड और डिव्हायडर’ अशा आशयाचे जाहीर फलक उभारले आहेत. त्याचप्रमाणे सदर बॅरिकेड्स कसे गैरसोयीचे आहेत आणि त्यांच्यामुळे नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो, याची ठळक छायाचित्रे एका फलकावर लावून व्यथा व्यक्त करण्यात आली आहे.
बॅरिकेड्सच्या ठिकाणी लावण्यात आलेले हे फलक सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आंदोलनात बॅरिकेड्स विरुद्धच्या लढ्याचे प्रमुख सुभाष घोलप यांच्यासह लढ्यात सहभागी जयश्री व मदन रेवाळे, दीपक गोंडाडकर, रणजीत हावळानाचे, अजित नाईक आदींनी ही आंदोलनाची आगळी संकल्पना राबविली आहे.
पहिल्या रेल्वे गेट येथे काँग्रेस रोडवर घालण्यात आलेले बॅरिकेड्स तात्काळ हटविण्याबरोबरच सदर गैरसोयीच्या बॅरीकेट्स बाबत सखोल चौकशी केली जावी आणि येथील रहिवाशांना न्याय मिळावा, अशी मागणी सुभाष घोलप यांनी केली आहे.