कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत -जामखेड (महाराष्ट्र) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची तोफ बेळगावमध्ये धडाडणार आहे.
आमदार होण्याबरोबरच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले रोहित पवार आता क्रिकेट मैदानाऐवजी बेळगावच्या निवडणूक मैदानात उडी घेऊन म. ए. समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.
आमदार रोहित पवार शनिवारी बेळगाव दाखल होणार असून त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पद यात्रा होऊन उत्तरचे समिती उमेदवार अमर येळळूरकर जाहीर सभा आणि खडक गल्ली, भडकल गल्ली आदी भागात प्रचार पदयात्रा होणार आहे. दुसऱ्या दिवशी येत्या रविवारी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदयात्रेत ते सहभागी होणार आहेत.
त्यानंतर रविवारी दुपारी ते खानापूरचा दौरा करणार असून सायंकाळी बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये त्यांची विराट पदयात्रा आणि जाहीर सभा होणार आहे. आमदार रोहित पवार यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी आर. आर. पाटील यांचे सुपुत्र युवा नेते रोहित पाटील, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील जाहीर सभा घेणार आहेत.
खासदार राऊत येत्या 3 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. बेळगाव, दक्षिण, उत्तर, ग्रामीण व यमकनमर्डी मतदारसंघासाठी संयुक्त महाराष्ट्र चौक येथे, त्याचप्रमाणे खानापूर येथे देखील त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
युवा नेते रोहित पाटील यांची 2 मे रोजी जांबोटी व इतर ठिकाणी प्रचार सभा होणार आहे. खासदार जयंत पाटील हे देखील बेळगावला येत असून 7 मे रोजी बेळगाव, दक्षिण, उत्तर व ग्रामीण मतदार संघासह खानापुरात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.