बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार संघात एकमेव उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. समितीकडे इच्छुकांचे अर्ज दाखल झाले असून खानापूर वगळता दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदार संघाचे उमेदवार अद्याप निश्चित होणे बाकी आहे.
आज उत्तर मतदार संघाच्या उमेदवारीसंदर्भात एन. बी. खांडेकर आणि बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत उत्तर मतदार संघासाठी इच्छुक असणाऱ्या ऍड. अमर येळ्ळूरकर आणि नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
३१ जणांच्या कमिटीतील २८ जणांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवारांना स्वतंत्रपणे बोलावून त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. याचप्रमाणे सीमाप्रश्नाच्या लढ्याच्या अनुषंगाने निवडणूक कशी लढवावी यासंदर्भात मते जाणून घेण्यात आली. उत्तर मतदार संघाच्या उमेदवार निवडीसंदर्भात हि पहिलीच बैठक आज बोलाविण्यात आली होती. यावेळी दोन्ही इच्छुक उमेदवारांना सामंजस्याने समेट घडविण्यासंदर्भात सल्ला देण्यात आला.
मात्र दोन्ही उमेदवारांनी निवड प्रक्रियेला सामोरे जाण्याची इच्छा व्यक्त केली यामुळे उद्यापासून रीतसर निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान उत्तर मतदार संघातील जनतेची मते जाणून घेण्यात येणार आहेत. उत्तर मतदार संघात लिंगायत, मराठी आणि मुस्लिम समाजातील मतदारांचे प्राबल्य आहे. या तीन मतदारांसह इतर जाती धर्माची मतेही कशी समितीकडे वळविण्यात येतील, याबाबत धोरण आखण्यात येणार आहे.
यासह समितीमध्ये झालेल्या एकीमुळे अनेक तरुण पुन्हा समितीकडे परतत आहेत. यामुळे अशा तरुणांना पुन्हा समितीच्या प्रवाहात आणून उत्तर मतदार संघात समितीचा उमेदवार निवडून आणण्यासंदर्भात रणनीती आखण्यात येणार आहे.
या बैठकीला रायमान वाझ, गजानन पाटील, दत्ता जाधव, गणेश ओऊळकर, विकास कलाघटगी, विजय बोंगाळे, संजय मोरे, सुनील बाळेकुंद्री, विजय होनगेकर, संदीप चौगुले, पियुष हावळ, मोतेश बार्देशकर आदी उपस्थित होते.