बेळगाव लाईव्ह :शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्वसंमतीने यावेळी अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे थांबून विजयी करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आणि मराठी माणसाची आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
शहर म. ए. समितीची महत्वाची बैठक मंगळवारी (दि. 18) मराठा मंदिर सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी शहर समिती अध्यक्ष दीपक दळवी होते. यावेळी ते म्हणाले, सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी भाषेवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती एक लढ्याचा भाग म्हणून निवडणूक लढवत आली आहे.
यंदा रमाकांत कोंडूसकर यांना बेळगाव दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यांची स्वत:ची ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही ताकदीच्या जोरावर आम्ही गड सर करायचा आहे. बेळगाव उत्तरमध्ये अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्यासारखा नवा चेहरा समितीचा उमेदवार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आव्हान सर्वांना स्वीकाराचे आहे. त्यासाठी मराठी भाषिकांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. याच एकजुटीच्या बळावर समितीचा विजय निश्चित असणार आहे.
यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, बी. ओ. येतोजी, शिवराज पाटील, सागर पाटील, प्रकाश अष्टेकर, मदन बामणे, एम. आर. पाटील यांच्यासह अनेकांनी रमाकांत कोंडूसकर आणि अमर येळ्ळुरकर यांना विजयी करण्याचा निर्धार भाषणातून व्यक्त केला.
यावेळी अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर, अॅड. अमर येळ्ळूरकर यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर प्रकाश मरगाळे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांचा गजर करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नेत्यांबाबत नाराजी
महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते समितीविरोधात प्रचार करण्यासाठी बेळगावात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या भुमिकेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील नेत्यांची कोणाशी बांधिलकी आहे, हे स्पष्ट करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. गिरीश महाजन आणि चित्रा वाघ यांच्या निषेधाचा ठराव बैठकीत मांडण्यात आला व समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नेत्यांना खरमरीत पत्र लिहिण्याचे ठरवण्यात आले.