बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी एकीची वज्रमूठ आवळावी अशी मागणी सीमावासीयातून केली गेली. समिती नेत्यांना अल्टिमेटम देण्यात आला. आज नाही तर कधीच नाही! असे ठणकावून सांगत समिती नेत्यांना एकी करण्यास भाग पाडले.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्यासाठी एकमेव उमेदवार अधीकृतपणे जाहीर करण्याची मागणीही झाली. यानुसार समितीने बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण आणि खानापूर मतदार संघात सर्वानुमते, निवड समितीच्या माध्यमातून आणि जनमत घेऊन एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची घोषणा केली. चारही मतदार संघात निवड कमिटीची उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून जे चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, त्यांच्या नावांच्या ‘आर फोर्थ फॅक्टर’ ची चर्चा सीमाभागात सुरु आहे.
समितीच्या चारही उमेदवारांच्या नावात इंग्रजी अल्फाबेट मधील ‘R’ आणि मराठीतील ‘र’ हि सामान्य गोष्ट ठरली आहे. खानापूर मतदार संघातून समितीच्या झेंड्याखाली निवडणूक वाढविणारे मु’र’लीधर पाटील, बेळगाव उत्तरचे अम’र’ येळ्ळू’र’क’र’, बेळगाव दक्षिणचे ‘र’माकांत कोंडुसक’र’ आणि बेळगाव ग्रामीणचे आ’र’ (R). एम. चौगुले अशा चारही उमेदवारांच्या नावात र हे अक्षर सामान्य आहे.
बेळगावमधील या चार मतदार संघात पुन्हा एकदा समितीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी जनता सज्ज झाली आहे. गेल्या दोन निवडणुकीत समितीला पडलेली खिंडार आणि अंतर्गत मतभेद यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहाला लागलेले मराठी मतदार या निवडणुकीत जोमाने कार्याला लागत समितीच्या बाजूने उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करत आहेत.
चारही बाजूंनी समितीच्या नावाचा डंका सुरु झाला आहे. समितीसाठी आणि मराठी जनतेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून उमेदवारांच्या नावातील ‘आर फोर्थ फॅक्टर’ हे ‘विन फोर्थ फॅक्टर’ ठरेल, आणि सीमाभागात समितीच्या नावाचा पुन्हा एक नवा इतिहास रचला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.