कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील जलजीवन मिशन योजनेचे काम गेल्या 6 महिन्यांपासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा सदर काम युद्ध पातळीवर येत्या 30 एप्रिल पूर्वी पूर्ण करण्यात यावे अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा ग्रा. पं. सदस्या पद्मश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील कुप्पटगिरीतील महिलांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
कुप्पटगिरी ग्रामपंचायत सदस्या पद्मश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन नुकतेच निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी निवेदनाचा स्वीकार केला. तसेच तात्काळ ता. पं. अधिकारी यगनगौडर यांना बोलावून ग्रा. पं. सदस्या पद्मश्री पाटील यांच्या मागणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली.
ग्रामीण भागातील प्रत्येक घराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारकडून जलजीवन मिशन योजना (जेजेएम) राबविण्यात येत असून कुपटगिरी गावातील या योजनेच्या कामाचे कंत्राट बसवराज हुंदरी यांना मिळाले आहे. मात्र कंत्राटदार हुंदरी यांनी हे काम वेळेत पूर्ण करण्याऐवजी गेल्या 6 महिन्यापासून अर्धवट स्थितीत टाकले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. याखेरीज योजनेची पाईपलाईन घालण्यासाठी गावातील रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी चांगले रस्ते उध्वस्त होऊन वाहन चालक व पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कंत्राटदाराच्या बेजबाबदार वृत्तीच्या विरोधात तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीकडे तसेच जनजीवन मिशन अधिकाऱ्यांकडे तक्रार करताना गावातील जेजेएमचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. अधिकाऱ्यांनी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना केल्या नाहीत. दुसरीकडे कंत्राटदार हुंदरी यांनी काम अर्धवट स्थितीत असताना आपली बिलही काढली आहेत.
त्यामुळे कंत्राटदार हे काम पूर्ण करणार नाही याची खात्री झाल्याने ग्रा. पं. सदस्य पद्मश्री पाटील यांनी गावातील महिलांची बैठक घेतली. सदर बैठकीत अर्धवट स्थितीतील काम युद्धपातळीवर येत्या 30 एप्रिल पूर्वी पूर्ण न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. तसेच त्यानुसार उपरोक्त तक्रारीचा तपशील असलेले निवेदन निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.