Thursday, January 9, 2025

/

कोंडुसकरांना समितीच्या बालेकिल्ल्यातून भरघोस पाठिंबा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांपैकी सर्वाधिक चुरशीची आणि तगडी लढत दक्षिण विधानसभा मतदार संघात होणार होणार आहे. भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांची पकड असलेल्या दक्षिणेवर तोडीस तोड उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून रमाकांत कोंडुसकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.

समितीचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या येळ्ळूर गावात जे पेरलं जातं तेच संपूर्ण सीमाभागात उगवतं असं मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदार संघात पुन्हा एकदा समितीचा आवाज बुलंद करण्यासाठी आज येळ्ळूरमधील अनेक युवक संघटनांनी रमाकांत कोंडुसकरांच्या उमेदवारीला पसंती दर्शविली आहे. सीमालढ्याचे केंद्र आणि साराबंदी चळवळीची सुरुवात करणाऱ्या येळ्ळूर गावातील रामदेव गल्ली, विराट गल्ली, छत्रपती शिवाजी युवक मंडळ, शिवसेना शाखा आणि अनेक संघटना, युवक मंडळांनी रमाकांत कोंडुसकरच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला आहे.

समितीमध्ये पडलेल्या दुहीमुळे आजपर्यंत या भागात समितीला या मतदार संघात म्हणावा तसा विजय मिळविता आलेला नाही. २०१३ साली समितीने संभाजी पाटील यांच्यासारखा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने समितीला विजय मिळविता आला. मात्र २०१३ वगळता २००८ आणि २०१८ साली झालेल्या बंडखोरीमुळे समितीला पराभव पत्करावा लागला. या मतदारसंघातील मराठी भाषिकांचे मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी अनेक युक्त्या लढविल्या आहेत. मात्र राष्ट्रीय पक्षांना तगडे आव्हान देण्यासाठी आणि जशास तसे उत्तर देऊन पुन्हा एकदा मराठी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी समितीने मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची गरज आहे.Konduskar yellur

मराठी भाषिकांच्या मतावर डोळा ठेवून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राजकारण करून मराठी भाषिकांची मने वळवू पाहणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना ठोस उत्तर देण्याची सुवर्णसंधी मराठी भाषिक आणि समितीकडे चालून आली आहे. भाजपमधील नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद लक्षात घेत या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे समितीचा विजय निश्चित आहे. मात्र यासाठी समितीने एकमेव उमेदवार आणि तोही सामर्थ्यशाली असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे अत्यावश्यक आहे.

दक्षिण मतदार संघावर असलेला विद्यमान आमदारांचा प्रभाव पाहता या निवडणुकीत त्यांना टक्कर देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे गरजेचे आहे. यामुळे तोडीस तोड असणारा एकमेव उमेदवार म्हणून रमाकांत कोंडुस्कर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. रमाकांत कोंडुसकर यांनी समितीकडे या मतदार संघासाठी प्रतिज्ञापत्र सादर केले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोठा युवावर्ग आपल्या समर्थनार्थ वळविला आहे. रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडे मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांचे बळ आहे. शिवाय दक्षिण मतदार संघात आजवर त्यांनी कोणत्याही पदाविना अनेक उपक्रम राबवत सर्वसामान्यांना, तळागाळातील नागरिकांना आपुलकीने मदत केली आहे. त्यामुळे समिती उमेदवारीसाठी जनमताचा कौल त्यांच्या बाजूने अधिक आहे. शिवाय रमाकांत कोंडुसकर यांच्याकडेच अभय पाटील यांना टक्कर देण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे समितीकडून त्यांनाच उमेदवारी जाहीर होईल, असे वातावरण सध्या दिसून येत आहे.समितीला या मतदार संघात मागील निवडणुकीत पडलेल्या मतापेक्षा आणखी २० – ३० हजार मतदानाची गरज आहे. आणि हि विजयश्री खेचून आणण्यासाठी समितीकडे कोंडुसकर यांच्यासारखा नेता आहे.

एकंदर वातावरण पाहता, दक्षिणमधील निवडणूक बेळगावमधील सर्वाधिक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र आहे. या भागातील मराठी मतदारांची संख्या पाहता राष्ट्रीय पक्षांनी आधीपासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मराठी भाषिकांना विविध आमिष आणि विकासाचे गाजर दाखवून आपल्याबाजूने वळविण्याचे काम राष्ट्रीय पक्षांनी केले आहे. मात्र समितीने जर तोडीस तोड उमेदवार या मतदार संघात निवडणूक रिंगणात उतरवला तर या निवडणुकीत समितीचीच सत्ता नक्कीच स्थापन होईल, यात तिळमात्र शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.