कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसमधून नेण्यात येत असलेले 6 लाख 68 हजार 900 रुपये किमतीचे 9650 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची घटना कोगनोळी चेकपोस्ट येथे काल सायंकाळी घडली.
त्याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एका बसला काल शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील कोगनोळी चेक पोस्टच्या ठिकाणी तपासणीसाठी अडविण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये हरिराम शंकर माळी (रा. कोल्हापूर) या प्रवाशाकडे 6 लाख 68 हजार 900 रुपये किमतीचे 9650 ग्रॅम चांदीचे दागिने आढळून आले.
सदर दागिन्यांसंदर्भात समर्पक स्पष्टीकरण तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात माळी हे असमर्थ ठरल्याने पोलिसांनी ते चांदीचे दागिने जप्त केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील हे देखील उपस्थित होते.
याव्यतिरिक्त कोगनोळी चेक पोस्टवर काल शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस मधील 8 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
चेक पोस्ट येथे पोलिसांनी बस अडवून तपासणी केली असता कोल्हापूरहून निपाणीकडे जात असलेल्या जिनगोंडा अण्णासाहेब पाटील (रा. पांगीर ता. चिक्कोडी) यांच्याकडे ही 8 लाख रुपयांची रोकड आढळून आली. सदर रकमे संदर्भात समर्पक स्पष्टीकरण तसेच आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी ती जप्त केली आहे.