विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुढील आठ दिवसात कणबर्गी निवासी योजनेचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही बेळगाव शहर विकास प्राधिकरण बुडा प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली आहे.
कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी काल बुधवारी बुडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर कणबर्गी योजनेसाठी काढलेल्या 106 कोटी 80 लाख रुपयांच्या निविदेची तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक पडताळणीला आठवड्याभरात मंजुरी मिळेल. त्यानंतर आर्थिक निविदा उघडली जाईल. त्यात या योजनेच्या कामासाठी ठेकेदार निश्चित होईल. निवडणूक झाल्यावर आठवड्याभरात ठेकेदाराला कार्यादेश दिला जाईल व योजनेचे काम सुरू होईल, असे बुडाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
रखडलेल्या कणबर्गी योजनेच्या कामाचा ठेका देण्यासाठी बुडाने मार्चमध्ये निविदा काढली आहे. निवेदला प्रतिसादही मिळाला आहे. बुडाने या योजनेची निविदा काढताना न्यायप्रविष्ट जमिनीचाही समावेश केला होता. पण संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केल्यावर ती जमीन वगळून नव्याने निविदा काढण्यात आली. मात्र ही निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच योजनेची अधिसूचना रद्द झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. बुडाने तातडीने आदेशाची प्रत मिळून पुढील कार्यवाही सुरू करणे आवश्यक होते. तथापि त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.