बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या पाच उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. मराठा मंदिर सभागृहात आज रविवारी निवड समितीतील 131 सदस्यांनी ही मुलाखत घेतली.
इच्छूक उमेदवार आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील, शिवाजी सुंठकर आणि अॅड. सुधीर चव्हाण यांच्या मुलाखती निवड घेण्यात आल्या. दोन तास मुलाखतीची प्रक्रिया चालली. सीमाप्रश्न, महाराष्ट्र एकीकरण समिती संघटना, इतर राष्ट्रीय पक्ष यावर आधारीत प्रश्न विचारण्यात आले.
दरम्यान सुरवातीला बैठकीला परवानगी नसल्यामुळे दुपारी साडेबाराच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या निरिक्षकांनी बैठक बंद पाडली. त्यानंतर समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी परवानगी पत्र आणले आणि बैठक सुरू झाली. या मुलाखतीत एस. एल. चौगुले यांच्या प्रश्नावरून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पण, नेत्यांच्या मध्यस्थीनंतर मुलाखती सुरळीत झाल्या.
आता 12 एप्रिल रोजी 131 जणांची निवड समिती इच्छूक उमेदवारांना मतदान करणार असून त्यातून बेळगाव ग्रामीणचा उमेदवार निवडण्यात येणार आहे, अशी माहिती सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी दिली आहे.
रविवारच्या मुलाखती ऐकण्यासाठी तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. त्यावर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिस नजर ठेऊन होते.
नियोजनाचा अभाव :तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठकीत नियोजनाचा अभाव आढळून आला निवडणुकीत नियोजन महत्वाचे असते असे असताना आचार संहिता काळात बैठक घेण्यासाठी विशेष परवानगीची गरज असते मात्र केवळ अर्ज देण्यात आला होता परवानगी घेतली नव्हती त्यामुळे निवडणूक निरीक्षकांनी धाव घेत बैठक थांबवली आणि मराठा मंदिरात जमलेल्या समिती कार्यकर्त्यांना बाहेर काढले त्यावेळी जाग आलेल्या समिती नेत्यांनी परवानगी आणली मग पुन्हा बैठक सुरू झाली. निवडणुकीत नियोजन नसल्याचा फटका निवड समिती बैठकीतील सदस्यांना सहन करावा लागला.