बेळगावमध्ये गेल्या 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात सहभागी मंत्री आमदार व अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेल से संपूर्ण बिल अदा करण्यात आले आहे. शहर आणि परिसरातील 76 हॉटेल मालकांच्या बँक खात्यावर एकूण 5 कोटी 67 लाख 25 हजार रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.
बेळगाव सुवर्ण विधानसभेत येथे गेल्या डिसेंबर अखेर पार पडलेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनात सहभागी मंत्री, आमदार, अधिकारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची निवासाची व्यवस्था करण्यासाठी यंदा 80 हॉटेल्स भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. संबंधित सर्वांची निवासाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली होती.
अधिवेशन संपल्यावर लगेचच महापालिकेने संबंधित हॉटेल मालकांना बिल सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी 80 पैकी 76 हॉटेल मालकांनी 5 कोटी 67 लाख 25 हजार रुपये बिल सादर केले होते. महापालिकेने ते बील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास योजना विभागाकडे पाठवले होते.
सदर बिल अदा करण्यास प्रारंभी विलंब करण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमांनी हॉटेल मालकांची बाजू मांडत आवाज उठवताच पहिल्या टप्प्यात 70 टक्के बिल गेल्या फेब्रुवारी महिन्यात अदा करण्यात आले होते. आता उर्वरित 30 टक्के बिल देखील थेट हॉटेल मालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे.
एकंदर अधिवेशन झाल्यानंतर तीन महिन्यातच प्रशासनाने हॉटेल मालकांचा हिशेब 100 टक्के चुकता केला आहे. मागील अधिवेशन काळातील बिल अत्यंत उशिरा मिळाले असल्यामुळे यंदा देखील तोच अनुभव येणार या विचाराने हॉटेल मालकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र यावेळी बिल लवकर मिळाल्याने हॉटेल मालकांची नाराजी दूर झाली आहे.