हेस्कॉमने गेल्या मंगळवारपासून बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टीम) ॲपच्या माध्यमातून विजेचे बिल भरण्याच्या सर्व ऑनलाईन सेवा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना सध्या फक्त हेस्कॉमच्या वेबसाईटवरूनच वीज भरता येणार आहे.
एकंदर सध्या वीज ग्राहकांना गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि इतर ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे विजेचे बिल भरण्यासाठी वेबसाईटच्या अनेक चरणांची मालिका पार करावी लागणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची सध्या गैरसोय होत आहे. यासाठी हेस्कॉमने नवीन वेबसाईट लिंक प्रसिद्धीस दिली आहे. विज बिल भरण्यासाठी ग्राहक त्यांच्या स्थानावर आधारित पुढील लिंकला भेट देऊ शकतात. शहरी भाग -https://www.hescom.co.in/SCP/Myhome.aspx ग्रामीण भाग -https://hescomonlineservices.nsoft.in/ विजेचे बिल बेळगाव वन सेंटर किंवा हेस्कॉम कार्यालयात भरावे. या खेरीज शहरातील खंजर गल्ली, खासबाग, गोवावेस, शहापूर, उद्यमबाग आदी ठिकाणी असलेल्या कॅश काऊंटरवर विज बिल भरणा सेवा उपलब्ध आहे.
दरम्यान, बीबीपीएस व्यासपीठाच्या माध्यमातून विजेचे बिल संकलित करण्याकरिता भारतीय बिल पे पेमेंट युनिट चालविण्याचे कंत्राट देण्यासाठी हेस्कॉमने अलीकडेच नवी निविदा जारी केली आहे. बीबीपीएस हे सर्व प्रकारची बिल भरण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले एकात्मिक ऑनलाईन व्यासपीठ आहे.