बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचाराची उंची दिवसेंदिवस वाढत असून प्रचाराला सुरुवातीलाच रंग चढला आहे. अवघ्या दुसऱ्या दिवशी संभाजी रोड खासबाग येथे उत्साही मतदार आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा पुष्पहार चक्क क्रेनच्या सहाय्याने रमाकांत कोंडुसकर यांना घालून आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. हाराच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
एकंदर चित्र पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना समस्त मराठी भाषिकांचा एकतर्फी पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्वत्र कोंडुसकर यांच्या नावाची चर्चा ऐकावयास मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती फक्त संघटना नव्हे तर ते आंदोलनाचे नांव आहे. या आंदोलनात अनेक पद्धतीने लोक आपली मत व्यक्त करत असतात.
मराठी माणसाच्या आत्मसन्मानाची उंची खूप मोठी आहे आणि त्या उंचीचे प्रतीक म्हणून संभाजी रोड खासबाग येथे क्रेनची मदत घ्यावी लागेल इतका प्रचंड मोठा पुष्पहार रमाकांत कोंडुसकर यांना अर्पण करण्यात आला. ही कृती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उंचावलेल्या मनोधैर्याची आहे. तसेच एकंदर मराठी माणूस आता कुठपर्यंत पोहोचला आहे ते दर्शवणारी आहे. रमाकांत कोंडुसकर यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता दक्षिण मतदार संघात समितीची लाट निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोंडुसकर यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
कोंडुस्कर यांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत त्यांना मिळणारा पाठिंबा म्हणजे सीमाभागात ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार उभे आहेत त्यांना एक प्रकारे पाठबळ देण्याची कृती आहे. या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत असून बेळगाव दक्षिणमधील मराठी भाषिकांचा आदर्श घेऊन संबंधित मतदार संघातील मराठी बांधव समितीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण मतदार संघात सध्याच्या घडीला रमाकांत कोंडुसकर नावाचे वादळ घोंगावण्यास सुरुवात झाली आहे.
या वादळातून भगवी लाट निर्माण झाली असून ही लाट सीमाभागातील अन्य मतदार संघात पसरणार आहे आणि या लाटेचा समिती उमेदवारांना निश्चितपणे फायदा होणार आहे. एकंदर मराठी माणूस संघटित झाला तर काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण सध्या बेळगाव दक्षिण मतदार संघात पहावयास मिळत आहे.
आज मराठी माणूस इतक्या प्रचंड संख्येने एकत्रित आल्यामुळे लोकांच्या मनातील 30 -40 वर्षांपूर्वीच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत. रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारासाठी होणारी गर्दी, त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता जाणकार ज्येष्ठ मंडळींकडून जुन्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. एकेकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीची सीमावर्तीय भागावर एक प्रकारची जरब, वचक होता.
रमाकांत कोंडुसकर यांनी ती जरब आणि वचक पुन्हा निर्माण करण्याच्या ताकदीचा स्फुर्ल्लिंग मराठी माणसांमध्ये पेटविला आहे. संभाजी रोड, खासबाग येथे कोंडुसकर यांना प्रचंड मोठा पुष्पहार घालण्याची कृती हे मराठी माणसांची मनगटं बळकट होण्याबरोबरच त्यांच्यामध्ये लढण्याची प्रचंड ऊर्जा निर्माण झाल्याचे द्योतक आहे, असे म्हटल्यास वावगे करू नये.