बेळगाव लाईव्ह : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक इच्छुकांना भाजपने डावलले आहे. उमेदवारी ठरविण्यात किंगमेकर ठरलेल्या रमेश जारकीहोळी समर्थकांना उमेदवारी दिल्याने अनेक इच्छुकांमध्ये नाराजीसत्र सुरु झाले आहे.
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर खानापूर मतदार संघातील माजी आमदार आणि लक्ष्मण सवदी यांचे समर्थक असलेले अरविंद पाटील यांनीही अपेक्षाभंग झाल्याने येत्या दोन दिवसात मजबूत निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे.
खानापूर मतदार संघातून २०१८ साली झालेल्या निवडणुकीत पराभव पत्करलेले अरविंद पाटील यांनी २०२३ सालच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने भाजप प्रवेश केला होता.
मात्र ऐनवेळी भाजपने अरविंद पाटील यांनाही उमेदवारी देण्यात डावलले असून भाजपवर नाराज झालेल्या अरविंद पाटील यांनी परस्पर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन येत्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकीसंदर्भात योग्य तो निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
yes