कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून आज शनिवारी दुसऱ्या दिवशी एकूण 11 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे कालपासून दोन दिवसात एकूण 28 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये 26 पुरुष आणि दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शनिवारी दुसऱ्या दिवशी अथणी -2 कुडची एससी -1, अरभावी -1, बेळगाव उत्तर -2, कित्तूर -1, बैलहोंगल -2, सौंदत्ती यल्लमा -1 आणि रामदुर्ग -1 या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बेळगाव उत्तरसाठी आम आदमी पार्टी (आप) आणि नोंदणीकृत अपरिचित पक्ष (आरयूपी) यांच्याकडून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला.
जिल्ह्यात आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये भाजपच्या 2, आपच्या 3, नोंदणीकृत अपरिचित पक्षाच्या 3 आणि स्वतंत्र 3 उमेदवारांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे सर्व उमेदवार पुरुष उमेदवार आहेत.
जिल्ह्यातील निपाणी, चिक्कोडी -सदलगा, कागवाड, रायबाग एससी, हुक्केरी, गोकाक, यमकनमर्डी एसटी, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर या मतदारसंघासाठी आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
दरम्यान काल शुक्रवारपासून आज दिवस अखेर म्हणजे दोन दिवसात जिल्ह्यात एकूण 28 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये 26 पुरुष आणि 2 महिला उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या दोन दिवसात सर्वाधिक 11 उमेदवारी अर्ज नोंदणीकृत अपरिचित पक्षांकडून दाखल केले गेले आहेत.
त्या खालोखाल उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या स्वतंत्र उमेदवारांची संख्या 9 असून भाजप आणि आम आदमी पक्षातर्फे प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 20 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.