बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेच्या वेळापत्रकानुसार गुरुवार दि. १३ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे.
नामनिर्देशन पत्र सादर करण्याची वेळ निश्चित करण्यात आली असून, उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रविवार दि. १६ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने यादिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास परवानगी नाही.
उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारासह केवळ ५ जणांना निवडणूक अधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जाईल, तसेच १०० मीटरच्या आत फक्त ३ वाहनांना प्रवेश दिला जाईल. २१ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २४ एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
निवडणुकीसाठी १४६ खर्च व्यवस्थापन निरीक्षक, १२० सामान्य निरीक्षक आणि ३७ पोलिस निरीक्षकांसह अधिकारी/कर्मचारी यापूर्वीच राज्यात तैनात करण्यात आले आहेत. अधिकृत निवडणूक अधिसूचना उद्या जारी केली जाईल आणि या अधिसूचनेत मतदानाच्या वेळेसह इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, अशी माहिती कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.