बेळगाव लाईव्ह : निवडणुका मुक्त व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी आज बेळगाव जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघातील निवडणूक खर्च निरीक्षकांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची सुवर्णसौध येथे बैठक घेतली.
यावेळी बोलताना बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे खर्च निरीक्षक सुबोध सिंह यांनी सांगितले की, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या संदर्भात यापूर्वीच नियुक्त केलेल्या विविध पथकांना अधिक गतीने काम करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी विविध मतदार संघातील खर्च निरीक्षकांनी प्राप्तिकर, रेल्वे, उत्पादन शुल्क यासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, त्याचबरोबर निवडणुकीतील अनियमितता आणि मतदारांना आमिष दाखविणाऱ्या बाबतीत सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील, संशयास्पद डिजिटल आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले पाहिजे.
संबंधित माहिती निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांना द्यावी, अशा महत्वपूर्ण सूचना करून विचार मांडण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निःपक्षपातीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार करण्यात आलेली विविध पथके, चेकपोस्ट, आतापर्यंत जप्त केलेल्या वस्तू यासह सर्व माहिती त्यांनी दिली.
निवडणुकीतील अनियमिततेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील एकूण ५८ एफएसटी, ६६ एसएसटी, १८ व्हीव्हीटी आणि ५१ व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम तयार करण्यात आल्या असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ही सर्व पथके कार्यरत झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी निवडणुकीच्या निमित्ताने एकूण ११५०९१९७० रोख आणि ५३.६७ लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत रोख, वाहने व इतर वस्तूंसह एकूण १९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वेव्ह कास्टिंगसंदर्भात माहिती देताना, राज्यातील सर्वाधिक २२१७ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात येत आहे. मतदान केंद्राची संवेदनशीलता लक्षात घेऊन अठरा मतदान केंद्रांमधून २२१७ मतदान केंद्रांची निवड करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनीही निवडणुकी संदर्भातील तयारीची माहिती दिली. या बैठकीला जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी हर्षल भोयर, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे, सांबरा विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांच्यासह विविध विभागांचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते.