बेळगाव : यंदा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी १५ दिवस अगोदरच जिल्ह्यात चेकपोस्ट, भरारी पथकांकडून कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वसामान्यांसाठीही रोख रक्कम ठेवण्यासंदर्भात मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर झाली असून, या काळात एखाद्या सामान्य व्यक्तीला स्वतःकडे ५० हजार रुपयांपर्यंतची रोकड ठेवण्याची मुभा आहे. यापेक्षा अधिक रक्कम एखाद्याकडे आढळून आल्यास पैशांच्या स्त्रोताची माहिती द्यावी लागेल, असे निवडणूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर चेकपोस्ट आणि भरारी पथके अधिक सक्रिय झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी बेकायदेशीर बाबींना ऊत आल्याचे दिसून आले आहे. निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आतापर्यंत सुमारे ४ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मोठ्या स्वरुपात यंदा तपासणी, चौकशी व कारवाई चर्चेचा विषय ठरला आहे. त्याशिवाय आता सामान्य व्यक्तीला या कालावधीत स्वतःकडे किती पैसे ठेवता येऊ शकतात, त्याबाबतची माहिती आयोगाकडून दिला आहे. त्यानुसार ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित आली आहे.
इतरवेळी स्वतः कडे रोकड ठेवण्यासाठी मर्यादा नाही. मात्र, विधानसभेची निवडणूक घोषित होऊन आचारसंहिता जारी झाल्याने निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पैशांबाबत मर्यादा घातली आहे. अनिर्वायसंदर्भात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम घेऊन जाताना पैशांच्या स्त्रोताबाबतचे दाखले सादर करणे आवश्यक आहे.
त्यात एटीएम कार्डमधून पैसे काढण्यात आलेले असल्यास त्याची पावती, बँकेतून पैसे काढण्यात आल्यास पासबुकात त्याची नोंद किंवा अन्य एकाकडून उसने पैसे घेण्यात आल्यास त्याचा तपशिल किंवा कागदपत्रे प्रत्येकाने जवळ ठेवणे आवश्यक आहे. दाखल्याविना पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पथक किंवा चेकपोस्टच्या ठिकाणी संशयाने पाहिले जाईल. त्याला कारवाईला सामोर जावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.