बेळगाव लाईव्ह : एका बाजूला सीमावासीयांना आणि सीमालढ्याला पाठिंबा आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकात होणाऱ्या निवडणुकीत प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांचा पवित्रा यामुळे सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही स्टार प्रचारकांबरोबरच इतर प्रचारकांची एक मोठी फौज उभी केली असून हे प्रचारक कर्नाटकातील विविध मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. या यादीत प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री रमेश बागवे, सिद्धराम म्हेत्रे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआमचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्यासह सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते व पदाधिकारी अशा ५१ सदस्यांचा समावेश आहे.
कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रातून जाणारी ही प्रचारकांची टीम मराठी बहुल भागासह कर्नाटकच्या इतर मतदारसंघातही जोमाने प्रचार करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सीमाभागातील सीमावासीयांची व्यथा पाहून महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात निवडणूक काळात प्रचारासाठी येऊ नये अशी मागणी सीमावासीयांनी कोल्हापूर आणि मुंबई आंदोलनादरम्यान केली होती.
यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी पुन्हा कर्नाटकात प्रचारासाठी येण्याची तयारी सुरु केली आहे.
मात्र कर्नाटकात खितपत पडलेल्या सीमावासियांच्या भावनांचा विचार करून महाराष्ट्रातील नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारासाठी येऊ नये, अशा भावना सीमावासीयातून व्यक्त होत आहेत.