बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र बंडखोरीचे सत्र सुरु झाले असून बेळगावसह संपूर्ण राज्यभरात हि विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. बेळगावमधील चारही मतदार संघात ‘टफ फाईट’ देण्यास भाग पाडणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांची धास्ती राष्ट्रीय पक्षांनी घेतली असून आज खानापूर मतदार संघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खानापूर येथी शिवस्मारकाला अभिवादन करून शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, वाद्यवृंदाच्या ठेक्यावर, चौराशी देवस्थानापासून रॅलीच्या माध्यमातून अंजली निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासह भगवे झेंडे हाती घेतलेल्या समर्थकांनीही मिरवणुकीत सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.
खानापूर मतदार संघात भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या तिरंगी लढत होणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस मधून निवडणूक लढवून विजयी ठरलेल्या आमदार अंजली निंबाळकर यांना काँग्रेसने पुन्हा एक संधी दिली असून या निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनीही शक्ती प्रदर्शन करत खानापूर शहरांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आज मंगळवारी विद्यमान आमदार आणि निंबाळकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र या निवडणुकीत हॉर्स असे समजले जाणारे जीडीएस चे उमेदवार नासीर बागवान काल तुरळक समर्थकांसह अर्ज दाखल केला होता.