कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा करून आचारसंहिता लागू केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आता आचारसंहितेचे उल्लंघन व निवडणूक संदर्भात तक्रारींसाठी सी व्हिजील (cVIGIL) मोबाईल ॲप सुरू केल्याचे जाहीर केले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ही निवडणूक एका टप्प्यात होणार आहे. या दरम्यान गुन्हे, नियमांचे उल्लंघनांची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त होण्यासाठी हे ॲप विकसित केले आहे. निवडणूक आयोगाच्या या ॲपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर त्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. मतदारांची एखाद्या उमेदवाराविषयी तक्रार असल्यास ते या ॲपवर फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा पाठवू शकणार आहेत. सी व्हिजील ॲपमध्ये कॅमेरा असून त्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्ड व फोटो क्लिक करून तो निवडणूक आयोगाला पाठवता येतो.
नियमांचा भंग, मतदारांना आमिष किंवा पैसे वाटणे आदी स्वरूपाचे तपशील पाठवता येऊ शकतात. त्याबरोबरच माहिती किंवा लेखी तक्रार देता येणार आहे. किती लोकांनी तक्रारी केल्या याचा आकडा आणि त्यावर झालेली कारवाई याचा तपशीलही या ॲपद्वारे कळू शकतो. विशेष महत्त्वाचे म्हणजे या ॲपमध्ये तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्याची ही मुभा आहे. त्यामुळे आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास त्याचे नांव गोपनीय ठेवले जाऊ शकणार आहे