शिष्य : गुरुजी, आज तुम्ही फार उशिरा उठलात! योगासनं नाहीत, सूर्यनमस्कार नाही, आरोग्यावर तुमचं दुर्लक्ष झालं कि काय??
गुरुजी : नाही शिष्या, शरीराला उत्तम प्रकारचा आराम देणं हेदेखील तेवढंच महत्वाचं आहे. गेले अनेक दिवस कांताची चिंता करून मी अस्वस्थ होतो, आज निवांत झोपलो. यामुळे आज माझं शरीर प्रफुल्लित झालं आहे.
शिष्य : गुरुजी, कांताचं काय झालं?
गुरुजी : अरे, कांताचा सूर्योदय झाला! लोकांच्या मनावरची ‘मरगळ’ दूर होऊन जग ‘प्रकाश’मान झालं! सर्व वातावरण ‘मनोहारी’ झालं! सुंदररित्या सर्वकाही सुरु झाले आणि आता तेजोमय प्रकाशमान असे विश्व निर्माण होणार आहे!
शिष्य : गुरुजी, तुम्ही दक्षिण जिंकलो म्हणता! अजून तर तुमची लढाईही सुरु झाली नाही!
गुरुजी : अरे, लढाईसाठी स्वतःचा आत्मविश्वास असावा लागतो! तू काल बघितलं नाही का? तो काल जनसागर पसरलेला? प्रशानालाही वाटलं कि आपण यांच्यासाठी एक विशेष व्यवस्था स्थापन करावी! वेगळ्याच पद्धतीचं एक मनोहारी चित्र तयार झालं. आणि हे पाहून मला खात्री पटली कि दक्षिण दिग्विजय आपला होणार! आणि राजा छत्रपतींच्या आशीर्वादाने आपलं सारं काही भलं होणार आहे!
शिष्य : गुरुजी, या तुमच्या मनाचा सर्व संकल्पना आहेत बरं का! तुम्ही मनातले मांडे खाता! दिल्ली अजून दूर आहे!
गुरुजी : तू असं समजू नकोस! कोणतीही गोष्ट जिंकायची तर त्यासाठी यश आपल्या मनात पेरावं लागतं! यश आपल्या मनात जोवर पेरत नाही, तोवर स्वप्न सत्यात उतरत नाही! यश मनात पेरून घे! आणि काल असंच यश मराठी माणसाने मनात पेरून घेतलंय! ते सत्यात उतरेल! आणि कुणाला आवळे देणारे लोक मात्र घरात नसतील!
शिष्य : सीमाभागात इतर ठिकाणी समितीचं काय सुरु आहे?
गुरुजी : अरे एक लक्षात घे, एक लाट अशी येते कि त्यात सर्व काही वाहून जातं! आता हि लाट तयार झाली आहे. हि लाट कांताच्या निमित्ताने तयार झाली आहे. हि लाट उत्तरेपासून झाडांच्या गावापर्यंत जाईल!
शिष्य : बाजूच्या ग्रामीण भागाचं काय होणार?
गुरुजी : अरे त्याठिकाणी तर सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवार आहे! इथं निश्चित विजय आहे!
शिष्य : तुम्ही असं कसं म्हणता गुरुजी? गेल्या वेळी आपला उमेदवार हा अनेकवेळा कुस्ती लढलेला होता!
गुरुजी : अरे शिष्या, कुस्ती लढणं आणि कुस्तीची वेगळी भावना स्वतःच्या आत असणं यात फरक आहे! आता आलेली हि व्यक्ती रचनात्मक कार्य करणारी आहे! अनेक इमारती निर्माण केलेली व्यक्ती आहे! माणसाची, कार्याची रचना करून आपले कार्य सिद्धीस कसे न्यावे यात हि व्यक्ती तरबेज आहे! या व्यक्तीने केलेली अनेक कामे जनतेच्या कौतुकास पात्र ठरली आहेत…आजही या व्यक्तीकडून घेतलेल्या सर्व गोष्टींसाठी त्याचे कौतुक केले जाते! यातच त्याचे यश आहे!
शिष्य : गुरुजी, तुम्ही खूप अभ्यास करताय असं दिसतंय!
गुरुजी : बाळा, नुसत्या पोथ्या वाचून काही होत नाही! जग उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं! काही मरगळलेल्या मनाला ते समजत नव्हतं! अशांची जनतेने कानउघाडणी करावी लागते! समजलं का काही?