शिष्य : चिरमुरे खाऊन खूप दिवस झाले.. आता निवडणुकीचे अर्ज माघारी घेऊन झाले.. आज पासून प्रचार देखील सुरु होईल… काय वातावरण सीमाभागात गुरुजी?
गुरुजी : वातावरण तर चांगलं आहे. पण काही स्वयंभू नेते राष्ट्रात गेलेत… उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा उपसायचं काम सुरु आहे! त्यासाठी वानवळा आणायसाठी नेते गेलेत अशी लोकात चर्चा आहे. वत्सा, त्यांच्या पाठीमागे पुढे थोडं फिरत जा…वातावरण कसं आहे बघत जा…!
शिष्य : गुरुजी, तुम्ही लोकांकडे कायम संशयाच्या नजरेने बघता. लोकांच्या हालचाली वगैरे वगैरे तुम्हाला संशयास्पदच कसं काय वाटतं?
गुरुजी : बाबारे, दिवस निवडणुकीचे आहेत. कोण काय करतं, कोण कुणाचा पाठिंबा घेतं, कोण बॅग घेतं…! कोण बारीक सारीक चिरीमिरी घेतं… यावर लक्ष ठेवावं लागतं…! माणसं भुरटी असतात… चोरटी असतात… त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं.. आणि वत्सा, ज्यावेळी माणूस एखाद्या कार्यात गुंतलेला असतो.. त्यावेळी त्यानं चारी बाजूनी सजग असायला लागतं! तरच तुमचा उमेदवार यशस्वी होऊ शकतो…!
शिष्य : गुरुजी, सध्याचं वातावरण तर गडाकडे फार जोरात चाललेलं होतं.. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली होती…! येळ्ळूरमध्ये त्सुनामी तर नव्हती ना गुरुजी…?
गुरुजी : कांताची त्सुनामीच आली होती. रस्ते भरून गेले होते.. येळ्ळूर गाव हे समितीचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचबरोबर तिथल्या माणसाच्या मनामनात मराठीचं प्रेम पेरलं गेलेलं आहे. तिथल्या माणसाच्या उपजत गुणातच मराठी आहे. त्याचा एक हुंकार सगळ्यांनी बघितला. आणि गडाच्या भोवती भगवी लाट उसळलेली बघितली. आणि विरोधकांना धडकी भरल्याची शक्यता आहे.
शिष्य : गुरुजी, एका लाटेने कांताचं वातावरण निर्माण झालं असं तुम्ही सांगता, हे कसं काय?
गुरुजी : वत्सा, मी शितावरून भाताची परीक्षा करतो. सगळा भात किवचत बसत नाही. लोकांची इच्छा काय आहे हे मला समजतं. आजवरची गोष्ट वेगळी होती. आजवर नेते उमेदवार ठरवत होते. कार्यकर्ते त्याला निवडून देत होते यावेळी कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार निवडून दिला असून जाहीर पाठिंबा देत उमेदवाराला विजयी करण्यासाठी जबाबदारी स्वीकारली आहे. हि परिस्थिती या भागात पहिल्यांदाच उद्भवली आहे. त्यामुळे क्रांती मोर्चावेळी ज्यापद्धतीने लोक रस्त्यावर उतरले त्यापद्धतीने आता यावेळी या निवडणुकीच्या कार्यात कामाला लागतील, आणि कांताच काय सगळ्याच ठिकाणी भगवा फडकेल यात काही शंकाच नाही…
शिष्य : राष्ट्रीय पक्षांची पैसे वाटपाची परिस्थिती काय आहे गुरुजी???
गुरुजी : अरे पैशानं कुठं काय विकत घेता येतं? स्वाभिमान, अभिमान हा विकत घेता येत नाही. तो उपजत असावा लागतो. जे बिकाउ असतात, ते टाकाऊ असतात. आणि टाकलेल्याना आपण कुठं काय विचारलंय?? आणि आपला संघटनेचा परीघ वाढत चाललाय. इतर पक्षात गेलेले कार्यकर्ते आपल्या संघटनेकडे परत येत चाललेत. याच कारण काय त्यांच्यातील आत्मभान, आत्मस्वाभिमान जागृत झालेला आहे. आणि ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी वातावरण निर्मिती होते. हळूहळू माणसं एकत्रित येतात. एक धीरानं कामाला लागतात.
शिष्य : गुरुजी उत्तरेतील अमरपट्टा बांधलेला उमेदवार ‘स्लो’ आहे असं म्हणतात… तिथं तसं पाहिलं तर विद्यमान डावलल्याने तेथील संधीचा फायदा करून घ्यायला हवा…!
गुरुजी : उत्तरेचा उमेदवार छुपा रुस्तम आहे….!!!! परिस्थितीच अशी येईल कि परिस्थितीच्या पोटातून काय बाहेर येईल, हे सांगता येत नाही. थोडा काळ जाऊदे.. वातावरण वेगळंच होईल.. ग्रामीण आणि दक्षिण च्या वातावरणाच्या जीवावर उत्तरेच उत्तर आपोआप मिळून जाईल.
शिष्य : गुरुजी, झाडांच्या गावाचं काय?
गुरुजी : झाडांच्या गावाचं काय? झाडांच्या गावातील लोक समितीच्या पाठीशी आहेत त्यामुळे झाडांच्या गावात समितीच विजयी होणार यात काहीच वाद नाही. सगळीकडे भगवा फडकेल. संघटना यशस्वी होईल…