शिष्य : गुरुजी, गावात तर वातावरण चांगलंच पसरलंय! निवड समितीकडे लोक आता नावं देऊ लागली आहेत. पाच जणांची समिती गठीत झाले. सगळं वातावरण कसं शुद्ध आणि मोकळं मोकळं वाटत आहे!
गुरुजी : (छद्मपणाने हसत) अरे वत्सा, पाच जणांची नावं तू बघितलिस का? त्यांचे व्यवहार काय आहेत बघितलेस का? एक तत्व आहे, हे लक्षात घे! वत्सा, जो आंदोलन चालवायचं असेल तर ते धनदांडगे, उद्योगपती, व्यापारी यांच्या मार्फत चालविले तर ते सरकारला उपयोगी असलेली धोरणं राबवितात. कारण त्यांचे सरकारशी लागेबांधे असावे लागतात.
शिष्य : गुरुजी, यात सरकार कुठं आलं?
गुरुजी : वत्सा, सरकार म्हणजेच सत्तेत असलेला माणूस! यांचे व्यवहार सगळे जमिनीचे व्यवहार! त्यासाठी एन ए करणे, लेआऊट करणे, जागा मोजणे – मापणे, सरकारी कागदपत्रे यासाठी यांना सरकारच्या अधिकाऱ्यांची, आमदाराची, खासदाराची मदत लागते. आणि जर यांच्या व्यवहारात अशा लोकांशी संबंध असतील, तर या गावच्या लोकांना कसं काय न्याय देऊ शकणार?
शिष्य : गुरुजी, मग हि प्रक्रिया पारदर्शक होणार नाही!
गुरुजी : दाखवतील पारदर्शक झाले म्हणून! पारदर्शक नक्कीच होणार नाही! कारण या लोकांचा आतापर्यंतचा इतिहास तपासून बघावा लागेल. यांचे कुणाकुणाशी संबंध आहेत हे तपासून बघावं लागेल. यांचे उद्योग-धंदे तपासून बघावे लागतील आणि त्यावेळी तुझ्या लक्षात येईल कि, हे लोक कुणाच्या संपर्कात आहेत आणि कुणासाठी काम करत आलेले आहेत….!
शिष्य : गुरुजी, हे असे निराशाजनक वातावरण तयार झालं आहे, मग या आंदोलनाचं कसं व्हायचं?
गुरुजी : वत्सा, हे वातावरण कसं व्हायचं असं तू विचारतोस! आजवर सामान्य जनता नेत्यांनी फसवलं म्हणून ओरडत, आक्रोश करायची आणि नेते मात्र स्वतःचे खिसे भरतच रहायचे!आजवर ज्यांच्या घरात खिळा नव्हता आज त्यांच्या माड्यावर माड्या उभ्या राहिल्या…! हे कुठून आलं? याच रहस्य उघड आहे!
शिष्य : मग या आंदोलनाला अर्थ तरी काय?
गुरुजी : तुला तर माहीतच आहे! आतापर्यंत हे आंदोलन सोडून अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षांच्या भजनी लागले. हे भजनी लागले नाहीत तर निराशेने निघून गेले! याचं कारणच हे आहे, कि या लोकांनी स्वतःला ‘अलीबाबा चाळीस चोर’ म्हणवून घेतले. आणि आपण चाळीस चोरच आहोत इतकेच आम्ही बस! असाही त्यांचा पवित्रा आहे! चाळीस चोरांमधील काही यमसदनी गेले! तरीही यांचं मत आहे कि, आम्ही एवढेच राहू! आणि आम्हीच सगळे भाऊ भाऊ मिळून खाऊ! अशापद्धतीने धोरण आहे!
शिष्य : मग, आम्ही आंदोलनात लाठ्या – काठ्या खातो, केसीस झेलतो मग आमचं कसं?
गुरुजी : अरे, तू सामान्य आहेस! तुला असामान्य होण्याचा कोणताही अधिकार नेत्यांनी ठेवला नाही! जगभर हेच धोरण राबविले जाते. जे सामान्य आहेत त्यांना अतिसामान्य करणे आणि जे असामान्य होते त्यांनी महनीय होणे!
शिष्य : मग गुरुजी याकडे तुम्ही कसे पाहता?
गुरुजी : आपल्या संघटनेचे अध्यक्ष मूग गिळून गप्प बसतात! सेक्रेटरी तोंडावर हात ठेवून बसतात! आणि खजिनदार मात्र खिशातून चिट्ठी काढून सगळ्यांची नावे जाहीर करतात! ‘जिसकी लाठी उसकी भैस’! अशी संघटनेची एकंदर कार्यप्रणालीच झाले!
शिष्य : गुरुजी, तर मग हे असंच होत राहणार का?
गुरुजी : हो, असंच होत राहणार. सामान्य जनता आपल्या मराठी मराठी म्हणून आक्रोश करत राहणार आणि नेते मात्र एन. ए. लेआऊट, जमीन जमले यात गुंतत जाणार! आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी आपल्या संघटनेचा बळी देणार! म्हणूनच हा लढा इतकी वर्षे भिजत पडला. नाहीतर तो कधीच सुटला असता…..
शिष्य : तर मग गुरुजी, विरोधक जे म्हणतात ते खरं आहे का? आमच्या नेत्यांनाच हा लढा अशापद्धतीने चालवायचा आहे का?
गुरुजी : अरे विरोधक कशाला म्हणायला पाहिजे? तू आणि मी काय म्हणतोय हे तर बघ! तुला काय वाटतं, मला काय वाटतं ते बघ! मातीत राहणारी सामान्य लोक आहोत आपण!
शिष्य : मग गुरुजी पुढं कसं होईल?
गुरुजी : आकाशात देव आहे! वरून पाहतो आहे! अशा पद्धतीचा एक भोंगळ खेळ लिहिलेला असतो. देव त्याच्या जागी त्याचं काम करत असतो, आपण आपल्या जागी आपलं काम करत असतो! आपण आपलं काम चोखपणे बजावायचं! आणि जे ना-लायक आहेत त्यांना खड्याप्रमाणे बाजूला करायचं! तरच हि संघटना मजबूत होईल, हेच लक्षात ठेव!