आकाशगंगा प्रकल्प अंतर्गत कॅम्प मधील कोंडाप्पा स्ट्रीट येथील स्वातंत्र्य काळातील जुन्या मृत विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच इंडिपेंडेंस रोड येथे नव्या विहिरीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रसिद्ध जलसंरक्षक आणि शून्य फाउंडेशनचे संस्थापक किरण निप्पाणीकर यांनी दिली.
आकाशगंगा प्रकल्प अंतर्गत कॅम्प येथील कोंडाप्पा स्ट्रीट येथील सध्या केरकचऱ्यामुळे भरलेल्या बंद अवस्थेतील जुन्या मृत विहिरीचे पुनरुज्जीवन आणि इंडिपेंडेंस रोड (मार्केट स्ट्रीट) येथील खुल्या जागेत नव्या विहिरीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
विधीवत भूमिपूजन करून या दोन्ही प्रकल्पांच्या कामाचा आज मंगळवारी किरण निप्पाणीकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. पाणीटंचाई दूर व्हावी आणि भूजल पातळी कमी होऊ नये यासाठी संबंधित दोन्ही विहिरींमध्ये पावसाच्या पाण्याची साठवणूक (रेन हार्वेस्टिंग) केली जाणार आहे. म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे जाणार आहे. पावसाच्या पाण्याचा वापर करून आपल्याला पाण्यासाठी ज्यांच्यावर अवलंबून राहावे लागते त्या राकसकोप जलाशयासह पाण्याच्या अन्य स्त्रोत्रांवरील ताण कमी होणार आहे. या खेरीज आपल्या भावी पिढीसाठी अतिशय बहुमोल असे भूजल स्त्रोत सुरक्षित राहणार आहे.
कोंडाप्पा स्ट्रीट येथील पुनरुज्जीवित केली जाणारी विहीर ही देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या काळात बांधण्यात आली आहे. कालांतराने देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ती बंद होऊन सध्या तिला कचराकुंडाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आमच्या तज्ज्ञांच्या पथकाने या विहिरीचे पुनर्जीवन करून तिला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला आहे. ज्यामुळे पुढील अनेक वर्ष या भागातील लोकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध होणार आहे असे सांगून या विहिरीचे आम्ही फक्त पुनरुज्जीवन करणार नसून तिला सौंदर्यदृष्ट्या सुखकारक बनवणार आहोत, असे किरण निप्पाणीकर यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत समाजाला असलेली विहिरींची गरज लक्षात घेऊन आम्ही अतिशय काळजीपूर्वक बारकाईने लक्ष देऊन हे प्रकल्प पूर्ण करणार आहोत. आमचे हे प्रकल्प स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन राबविले जाणार आहेत.
येत्या काळात आकाशगंगा प्रकल्पांतर्गत कॅन्टोन्मेंट हद्दीत पाच नव्या विहिरींची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या 22 विहिरींची स्वच्छता आणि त्या ठिकाणी रेन हार्वेस्टिंग, दोन मृत विहिरींचे पुनरुज्जीवन याखेरीज रेन हार्वेस्टिंगसाठी सुमारे 4 -5 कुपनलिका खोदण्याचा आमचा विचार आहे अशी माहितीही निप्पाणीकर यांनी दिली. तसेच कॅम्प येथे आकाशगंगा प्रकल्प राबवण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांनी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ आनंद के. यांचे आभार मानले.