बेळगाव लाईव्ह : भाजपने मंगळवारी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर विद्यमान आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी नाकारल्याचे समोर आले. मंगळवारी सायंकाळपासूनच सोशल मीडियावर बेनके समर्थक आणि मराठा समाजातील नागरिकांनी निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. मात्र बुधवारी राणी चन्नम्मा चौकात १२.३० पासून तब्बल १ तासाहून अधिक काळ रस्ता रोको करत अनिल बेनके समर्थकांनी निषेध व्यक्त केला.
राणी चन्नम्मा चौकात तासाहून अधिक काळ रास्ता रोको करणाऱ्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप हायकमांडचा निषेध व्यक्त केला. विद्यमान आमदारपदी विराजमान असणारे अनिल बेनके यांनी उत्तर मतदार संघाच्या विकासासाठी गेली ५ वर्षे अनेक परिश्रम घेतले आहेत.
या भागात त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही जातीय दंगली घडल्या नाहीत. सर्वधर्माच्या-जातीच्या आणि भाषेच्या लोकांना त्यांनी एकच न्याय दिला असून तळागाळातील जनतेसाठी त्यांनी प्रामाणिक कार्य केले आहे. मात्र त्यांचे हे कार्य जाणून हायकमांडने त्यांना हा न्याय दिला का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. भाजप हायकमांडने जाणीवपूर्वक त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप यावेळी समर्थकांनी केला.
आगामी निवडणुकीत भाजपने अनिल बेनके यांना उमेदवारी दिली असून या निर्णयाविरोधात आमदार अनिल बेनके यांनी स्वतः स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा सूर अनिल बेनके समर्थकांनी व्यक्त केला.
अनिल बेनके यांना बेळगाव मनपाच्या महापौरांसह भाजप नगरसेवकांनीही पाठिंबा दिला असून हायकमांडने हा निर्णय बदलावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी बेनके समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.