बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ग्रामीण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आतापर्यंत दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केला होता. आज निवड समितीकडे प्रतिज्ञापत्र आणि विनंती अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि समिती नेते, मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण या तिघांनी अर्ज सादर केले आहेत. यानंतर ग्रामीणमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या पाच वर पोहोचली आहे.
समिती नेते आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संचालक आर. आय. पाटील यांनी आजवर समितीच्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दर्शविला आहे. ग्रामीण भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटीकरण आणण्यासाठी आजतागायत आर. आय. पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
शिवाय सीमाप्रश्नी आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर हे देखील समितीमधून कार्यरत होते. मध्यंतरी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला होता. मात्र पुन्हा त्यांनी समितीचीच वाट धरली असून मागील विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपले नशीब आजमावले आहे.
ऍड. सुधीर चव्हाण हे महाराष्ट्र एकीकरण समितीशी बांधील असून गेली अनेक वर्षे त्यांनी समितीच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. ग्रामीण मतदार संघात तरुणांचे संघटन करण्यासाठी युवा नेते आर. एम. चौगुले यांनीही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. याचप्रमाणे रामचंद्र मोदगेकर यांचाही जनसंपर्क चांगला आहे.
निवड समितीकडून या पाचही उमेदवारांची मुलाखत घेऊन विविध निकषांवर अंतिम उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. उद्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कुणाकुणाला उमेदवारी जाहीर केली जाणार याकडे संपूर्ण सीमावासीयांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन निवडणुकीत बंडखोरी आणि गटातटाच्या राजकारणामुळे समितीला पत्करावी लागलेली हार या निवडणुकीत भरून निघेल अशी आशा मराठी भाषिकांनी लावून धरली आहे. यामुळे आता समितीच्या पुढील रणनीतीसंदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.