बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांची अस्मिता दडपण्यासाठी कर्नाटक सरकार आजपर्यंत अनेक कुरघोड्या करत आले आहे. मराठी माणसाची कशापद्धतीने गळचेपी करता येईल या दृष्टिकोनातून एकही संधी कर्नाटक प्रशासन वाया घालवत नाही.
कर्नाटकाच्या या धोरणाची प्रचिती नुकत्याच जाहीर झालेल्या उमेदवार यादीवरून येते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बेळगाव मधील मतदार संघात मराठी नेत्यांना डावलून पुन्हा एकदा मराठीद्वेष दाखवून दिला आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून एकदाही भाजपाला या मतदार संघात वर्चस्व प्रस्थापित करण्यात आले नाही. मात्र आमदार अनिल बेनके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचंड मताधिक्याने त्यांनी उत्तर मतदार संघावर बाजी मारली. उत्तर मतदार संघात लिंगायत समाजानंतर मराठी समाज मोठ्या प्रमाणात आहे.
याच मराठी मतांवर निवडून आलेल्या अनिल बेनके यांना यंदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली. अनिल बेनके हे मराठा समाजाशी निगडित असून ते मराठी भाषिक आहेत. याचप्रमाणे दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप ओबीसी मोर्चा राज्य सचिव किरण जाधव यांनाही भाजपने उमेदवारी नाकारली. किरण जाधव यांच्याकडेदेखील कार्यकर्त्यांचे मोठे बळ आहे.
शिवाय आपल्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी पक्ष संघटनेसाठी मोठे कार्य केले आहे. मराठा समाजातील अनेक तरुणांना पक्षाच्या प्रवाहात आणण्याचे कार्यदेखील किरण जाधव यांनी केले असून दक्षिण मतदार संघाच्या विद्यमान आमदारांनाच पुन्हा एकदा संधी देत किरण जाधव यांच्या उमेदवारीचा विचार भाजपने केला नाही.
शहराप्रमाणेच खानापूर मतदार संघात देखील भाजपने हाच कित्ता गिरवत माजी आमदार अरविंद पाटील यांना डावलले. अरविंद पाटील यांच्या ताफ्यात देखील कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा आहे. खानापूर तालुक्यात अरविंद पाटील यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. खानापूर हा समितीचा बालेकिल्ल्ला म्हणून प्रसिद्ध असून समितीच्या नावावरच अरविंद पाटील यांनी खानापूरचे आमदारपद भूषविले आहे. खानापूर मतदार संघ हा अस्सल मराठी भाषिकांचा मतदार संघ आहे. यामुळे खानापूर मतदार संघात मराठी भाषिकांचेच वर्चस्व आहे. याच मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून आलेल्या अरविंद पाटलांनी मागील निवडणुकीत झालेल्या बंडखोरीनंतर झालेल्या पराभवामुळे भाजपाची वाट धरली. या निवडणुकीत त्यांना संधी देण्यात येईल, अशी आशा त्यांना होती. मात्र ऐनवेळी भाजपने त्यांनादेखील उमेदवारी नाकारली.
एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता अनिल बेनके, अरविंद पाटील आणि किरण जाधव हे तीनही नेते मराठी आणि मराठा समाजाशी निगडित आहेत. आजवर मराठी भाषिकांच्या मतांवर त्यांनी सत्ता उपभोगली, पद – प्रतिष्ठा मिळविली. राष्ट्रीय पक्षांनी नाकारलेल्या उमेदवारीनंतर या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा द्यावा, अशी मागणी सीमावासीयातून जोर धरू लागली आहे. आज अनेक राष्ट्रीय पक्षातील नेते, अनेक समाजाच्या संघटना पक्षविरहित निर्णय घेतात. आपल्या समाजासाठी एकजूट दाखवतात. सीमाभागातील या दिग्गज नेत्यांना भाजपने उमेदवारी डावलल्यानंतर समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी का उभारू नये? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या मराठी समाजाने डोक्यावर घेऊन अशा नेत्यांना संधी दिली त्या मराठी समाजाच्या उपकारांची परतफेड करण्याची संधी या नेत्यांसमोर उभी ठाकली आहे. शिवाय सीमाभागात पुन्हा एकदा मराठीचे वर्चस्व प्रस्थापित करून मराठी अस्मिता अबाधित राखण्यासाठी या नेत्यांनी स्वाभिमानाला जागून समितीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन आपले मराठीपण सिद्ध करावे, अशी मागणी सीमाभागात करण्यात येत आहे.