बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील मागील तीन निवडणुकांपैकी सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने या मतदारसंघावर वर्चस्व राखले होते तर गत म्हणजे 2018 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ आपल्या कब्जात घेतला.
कर्नाटक विधानसभेच्या मागील 2008, 2013 आणि 2018 साली झालेल्या निवडणुकीच्या निकालांचे बेळगाव उत्तर मतदार संघात पुढील प्रमाणे चित्र पहावयास मिळावे. या मतदारसंघात पहिल्यांदा म्हणजे 2008 मधील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात होते.
सदर निवडणुकीत 61.79 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार फिरोज सेठ यांनी या निवडणुकीत 33.93 टक्के मतं मिळवून विजय संपादन केला. त्यांनी आपले जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकरगौडा पाटील यांना 3.05 टक्के इतक्या मत फरकाने पराभूत केले. शंकरगौडा पाटील यांना सेठ यांच्या तुलनेत निम्मी म्हणजे 30.88 टक्के मते पडली.
त्यानंतर 2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदारसंघातील निवडणूक रिंगणात 15 उमेदवार होते. यावेळी देखील काँग्रेसचे उमेदवार फिरोज सेठ यांनी बाजी मारली. त्यांनी निवडणुकीमध्ये झालेल्या 49.41 टक्के मतदानापैकी सर्वाधिक 39.16 टक्के मते घेऊन विजय मिळविला आणि या मतदारसंघावर काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा वर्चस्व मिळवून दिले. यावेळी फिरोज सेठ यांच्याकडून त्यांच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी स्वतंत्र (म. ए. समिती) उमेदवार रेणू किल्लेकर यांना 15.8 टक्के इतक्या मत फरकाने पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत किल्लेकर यांना 23.36 सलग दुसऱ्यांदा मतं मिळाली.
उत्तर मतदारसंघातील 2018 च्या निवडणुकीसाठी एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत 62.71 टक्के इतक्या प्रमाणात मतदान झाले आणि मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल देत काँग्रेसला हादरा दिला. सर्व थरात लोकप्रिय आणि व्यवसायाने वकील असलेले भाजप युवा नेते ॲड. अनिल बेनके यांनी ही निवडणूक 53.63 टक्के मते मिळवून जिंकली.
त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या फिरोज सेठ यांना 11.72 टक्के इतक्या मत फरकाने पराजित केले. सेठ यांना या निवडणुकीत 41.91 टक्के मते मिळाली आणि सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी होऊन ‘हॅटट्रिक’ साधण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.