बेळगावातील उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या ते जवळपास 38 अंश सेल्सिअस इतके आहे. तसेच वातावरणातील आद्रता 67 टक्के इतकी वाढली आहे. मानकांनुसार हे प्रमाण जाचक आणि असह्य आहे. त्यामुळे साहजिकच सध्या बेळगावला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
बेळगाव शहराचे तापमान काल मंगळवारी किमान 21.2 अंश सेल्सिअस आणि कमाल 37.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. उष्म्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बेळगावकरांनी उन्हापासून वाचण्यासाठी टोप्या, रुमाल, टॉवेल तसेच छत्री यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. उन्हामुळे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता असल्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.
आतापर्यंत बेळगावच्या इतिहासात गेल्या एप्रिल 2016 मध्ये सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्म्यात वाढ झाल्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळ ही कमी झाली असून दिवसभर ग्राहक नसल्यामुळे व्यापार ही मंदावला आहे.
अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्म्यामुळे शहरवासीय हैराण झाले असून शीतपियाना मागणी वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या गेल्या 18 दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढतच असून येत्या मे महिन्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याची उष्णतेची लाट लक्षात घेता गरज नसताना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे, उन्हात फिरणे, उन्हातून घरी आल्या आल्या फ्रिजचे थंडगार पाणी पिणे या गोष्टी नागरिकांनी टाळाव्यात असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमान वाढ सहन करता येऊ शकते.
मात्र नवजात बालक, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुनाट आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या अतीउष्ण वातावरणात प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.