बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित आणि उत्कंठावर्धक असणारी भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाली असून बेळगाव उत्तर, खानापूर, ग्रामीण, हुक्केरी आणि दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
या उमेदवार यादीत सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली असून विद्यमान आमदार अनिल बेनके यांना डावलून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खानापूर मतदार संघातून विठ्ठल हलगेकर, दक्षिण मधून अभय पाटील, हुक्केरी मधून निखिल कत्ती, ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर आणि अथणी मधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघात लिंगायत समाजाने अलीकडेच लिंगायत उमेदवार जाहीर केल्यास आपल्या सर्व संघटनांचा पाठिंबा देण्यात येईल, असे जाहीर केले होते. यामुळे हीच बाब हेरून भाजपने उत्तरमध्ये लिंगायत समाजातील डॉ. रवी पाटील यांना संधी दिली आहे. तर कर्नाटकातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या आग्रहामुळे अथणी, कागवाड आणि ग्रामीण मतदार संघात जारकीहोळी समर्थकांना संधी देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार.. pic.twitter.com/OPpriSIpja
— Belgaumlive (@belgaumlive) April 11, 2023
ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर, अथणीमधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदारांची असलेली पकड लक्षात घेत पुन्हा अभय पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली असून खानापूरमध्ये गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची यादी लक्षात घेत विठ्ठल हलगेकर यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या आशेने भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मात्र उमेदवारी नाकारली आहे.
हुक्केरी मतदार संघातून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे पुतणे निखिल कत्ती यांना संधी देण्यात आली असून भाजपने या मतदार संघात घराणेशाही जपत उमेदवारी जाहीर केल्याचे निदर्शनात येत आहे. याचबरोबर निपाणी मतदार संघात शशिकला जोल्ले, चिकोडी मतदार संघातून रमेश कत्ती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.