बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, निवडणूक विभागाने अधिकच बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली असून आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच चेकपोस्टवरील कडक तपासणी आणि बेळगाव शहर आणि परिसरात असलेले राजकीय फलक हटविण्यात अधिक तत्परता दाखविण्यात आली आहे.
बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात लावण्यात आलेला विविध फलकांमुळे या चौकाचे मूळ स्वरूप झाकोळले होते.
या परिसरात अनेक जुन्या इमारती असूनही केवळ फलकांमुळे हा परिसर भकास वाटत होता. अलीकडेच कॅंटोन्मेंट हद्दीत येणाऱ्या मार्गांवरील फलकदेखील हटविण्यात आले होते. या पाठोपाठ आता धर्मवीर संभाजी चौकातील फलक हटविल्याने या परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
या परिसरातील मोठमोठे फलक हटविण्यात आल्याने परिसराची शोभा तर वाढली आहे. शिवाय दररोज फलकांमुळे झाकोळून गेलेल्या परिसरात वावरताना नागरिक देखील वैतागले होते.
मात्र फलक हटविण्यात आल्याने नागरीकातून देखील समाधान व्यक्त होत आहे. या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहेच. शिवाय सोशल साईटवर येथील छायाचित्र वायरल झाल्यामुळे नेटकऱ्यांनीदेखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे.