बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण निवड समितीने आर. एम. चौगुले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय पाटील आणि रामचंद्र मोदगेकर आदी इच्छुकांनी समितीकडे ग्रामीण मतदार संघाच्या उमेदवारीसाठी विनंती अर्ज दाखल केला होता. यावर ग्रामीणच्या निवड समितीने आज चारही उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया राबवून, प्रत्येकाच्या वैयक्तिक मुलाखती घेऊन आर. एम. चौगुले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मूळचे मण्णूर गावचे सुपुत्र असलेले राजू एम. चौगुले हे आर्किटेक्ट इंजिनियर आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांनी अनेक युवकांना संघटित करून शेकडो युवकांना समितीशी जोडले आहे. अनेक गावोगावी भेट देत युवा संघटना बळकट करून राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या तरुणांना पुन्हा समितीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याच अनुषंगाने त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी विनंती अर्ज दाखल केला होता. त्यांचे एकंदर कार्य पाहून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.
आर. एम. चौगुले यांनी मण्णूर येथील सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे तर हिंडलगा हायस्कुलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून आर. एन. शेट्टी पॉलिटेक्निक महाविद्यालयात डिप्लोमा पूर्ण करून पुढे बीई पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
मण्णूर येथील संपूर्ण कुटुंब बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून बेळगाव आणि परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम त्यांच्यामार्फत झाले आहे. आर. एम. चौगुले यांनी गेल्या दोन वर्षात सीमाभागात झालेल्या शेतकरी आंदोलनातून सक्रिय सहभाग दर्शविला आहे.
याचप्रमाणे समितीच्या प्रत्येक आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत विविध स्पर्धा परीक्षा, यासह विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. त्यांच्या एकंदर कार्याचा आढावा घेत अखेर त्यांना तालुका समितीने उमेदवारी जाहीर केली असून आता समितीच्या झेंड्याखाली ग्रामीण मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मराठी भाषिक सज्ज झाले आहेत.