बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आणखी एक नवे विद्यापीठ स्थापन करण्याचे नियोजन सुरु आहे. ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या या विद्यापीठात संशोधन आणि मानवतावादी शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या विद्यापीठात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित आदी विषयांचेही शिक्षण दिले जाणार आहे.
थोर गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांचे नाव या विद्यापीठाला दिले जाणार असून विजापूर येथील सिद्धेश्वर स्वामींनी हे नाव विद्यापीठाला सुचवले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठातून निवृत्त झालेले गणिताचे प्रा. ताम्रपर्णी वेंकटेश विद्यापीठाचे समन्वयक आहेत. भास्कराचार्य विद्यापीठ हे अन्य पारंपरिक शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांपेक्षा वेगळे असेल.
या विद्यापीठात ऐतिहासिक अभ्यास, विविध भाषांचे भाषांतर, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान आदी विषयही शिकवले जाणार आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षण घेण्याचीही मुभा असेल. त्याद्वारे विद्यार्थ्यांना परदेशातील प्राध्यापकांच्या व्याख्यानांद्वारे शिक्षण दिले जाईल.
विद्यापीठाच्या उभारणीसाठी विविध समित्यांच्या स्थापना केल्या जात आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, सामान्य सल्लागार, अकॅडमिक परिषद आणि कार्यकारी परिषदेचा त्यामध्ये समावेश आहे.
सध्या पायाभूत विकास समितीकडून विद्यापीठासाठी जमीन अधिग्रहण आणि इमारत बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या विद्यापीठासाठी आवश्यक जमीन, पुस्तके जनतेतून जमा केल्या जाणाऱ्या पैशातून मिळवण्यात येणार आहेत.