Friday, December 27, 2024

/

विजय आपलाच : रमाकांत कोंडुसकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जनमत आणि निवड समितीच्या एकमुखी निर्णयानंतर अधिकृत उमेदवार म्हणून दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून आज हजारो समर्थकांच्या गर्दीत रमाकांत कोंडुसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांनी आपल्यावर विश्वास दाखवून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर , मराठी संस्कृतीवर होणारा अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी आणि सीमाप्रश्नी विधानसभेत आणि सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यासाठी आपण सज्ज आहोत. यासाठीच आपल्यावर समितीने अधिकृत उमेदवार म्हणून जबाबदारी सोपविली आहे. आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून आपण नक्कीच आपली जबाबदारी पार पाडू अशी ग्वाही रमाकांत कोंडुसकर यांनी दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारात महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचारासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांचा आपण निषेध व्यक्त करत असून सीमावासीयांसाठी महाराष्ट्रातील नेत्यांना तळमळ किंवा आपुलकी असेल तर पाचही मतदार संघात प्रचारासाठी येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील पाचही मतदार संघात समितीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळगावातील सर्व भाषिकांनी समितीला विजयी करण्याचा चंग बांधला असून जनता राष्ट्रीय पक्षांच्या राजकारणाला कंटाळली आहे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात जर विकास व्हायचा असेल तर महाराष्ट्र एकीकरण समिती शिवाय पर्याय नाही आहे असे मत बेळगाव उत्तरचे उमेदवार  वकील अमर येळळूरकर यांनी व्यक्त केले आहे.

सामाजिक न्याय आणि सामाजिक एकजूट दाखवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती हाच पर्याय आहे असेही त्यांनी नमूद केलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.