निवडणूक काळात खानापुरात समितीच्या प्रचार कार्यालयाचा मराठी फलक काढण्याचा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाकडून आता बेळगावात ठिकठिकाणी फडकविण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला जात आहे.
भगवा ध्वज हा हिंदू धर्माचे प्रतीक आहे. या पवित्र ध्वजाशी हिंदूंच्या धार्मिक भावना पूर्वापार जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळ आणि घरांवर भगवा ध्वज श्रद्धेने फडकविला जातो. मात्र निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून सध्या शहरातील घरांवर, गल्लोगल्ली, प्रमुख रस्ते आदी ठिकाणी फडकविण्यात आलेले भगवे ध्वज तसेच लावण्यात आलेल्या पताका हटविण्याचा आदेश प्रशासनाने दिला असल्याचे समजते.
या आदेशाची अंमलबजावणी करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी संभाजी रोड खासबाग परिसरातील रस्त्यावर लावण्यात आलेल्या पताका आणि भगवे ध्वज काढण्याची मोहीम हाती घेतली होती.
सदर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. भगवा ध्वज हिंदुत्वाचे प्रतीक असल्यामुळे शिवसेना आणि भाजप सारख्या पक्षांचा तो अधिकृत ध्वज आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेनुसार सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी लावलेले या पक्षांचे ध्वज खुशाल काढून टाकावेत त्याला आमचा विरोध नाही. मात्र निवडणुकीचे कारण सांगून राजकीय पक्षांच्या ध्वजांसमवेत सरसकट सर्व भगवे ध्वज काढण्याचा हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह संभाजी रोड खासबाग येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.
त्याचप्रमाणे भगवे ध्वज काढून जप्त करण्याच्या या प्रकारामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यासाठी पवित्र भगव्या ध्वजांना हात न लावता राजकारणाशी संबंधित ध्वजांचे उच्चाटन केले जावे. भगवे ध्वज काढण्याचा सदर प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.